दीपक जाधव / पुणेनवीन विद्यापीठ कायद्यानुसार आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालये; तसेच विद्यापीठांमध्ये विद्यार्थी निवडणुका घेण्याच्या परिनियमांना बुधवारी अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्ष, संघटनांना सहभागी होता येणार नाही. विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर निवडणूक लढवावी, अशी स्पष्ट शिफारस माजी कुलगुरू आर. एस. माळी यांच्या समितीने राज्य शासनाकडे केली आहे. सर्व महाविद्यालयांमध्ये एकाच दिवशी निवडणूक घेण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांच्या विभागांमध्ये निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. निवडणुकांचे परिनियम तयार करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर. एस. माळी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मंगळवार व बुधवार असे दोन दिवस समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विद्यार्थी निवडणुकांचे परिनियम तयार करून अंतिम स्वरूप देण्यात आले असल्याची माहिती आर. एस. माळी यांनी दिली. या शिफारशींना राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर त्या गॅझेटमध्ये प्रकाशित केल्या जातील. आगामी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर, आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होतील. महाविद्यालयांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना कार्यरत आहेत; मात्र राजकीय पक्ष, संघटना यांना या निवडणुकीमध्ये सहभागच घेता येणार नाही, अशी शिफारस करण्यात आली आहे. खर्चावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. महाविद्यालयांचे सुरुवातीचे दोन महिने निवडणुकींच्या गदारोळात जाणार आहेत. ही रणधुमाळी कशी निभावून न्यायची, असा प्रश्न अनेक प्राचार्यांना पडला आहे. खर्चाची मर्यादानिवडणूक आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांप्रमाणेच महाविद्यालयांच्या निवडणुकांसाठीही समितीकडून आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. निवडणूक लढविणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निवडणुकीसाठी किती खर्च करायचा, याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही मर्यादा ओलांडणारे विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत.निवडणुकांबाबतच्या महत्त्वपूर्ण शिफारशीमहाविद्यालयाला ४ प्रतिनिधी निवडून द्यावे लागणार.वय वर्षे २५च्या आतील विद्यार्थ्यांनाच निवडणूक लढविता येणार.रिपिटर, एटीकेटीचे विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र ठरणार.राजकीय पक्ष, संघटनांना सहभाग घेता येणार नाही.एकाच दिवशी सर्व महाविद्यालयांमध्ये निवडणूक प्रक्रिया. पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठाच्या विभागांमध्ये निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व महाविद्यालये व विद्यापीठांच्या विभागांना निवडणुका घेणे बंधनकारक आहे.
महाविद्यालयांत राजकीय पक्षांना नो एंट्री
By admin | Published: May 04, 2017 3:09 AM