पुणे : पश्चिम घाटातील जैवविविधता व पर्यावरण यांच्या संवर्धनाकरिता वनविभागाने पुढाकार घेतला आहे. याचा भाग म्हणून पश्चिम घाटांतर्गत येणा-या ताम्हिणी, सुधागड आणि मुळशी भागातील अंधारबन भागात पर्यावरणाच्या दृष्टीने ठरवून देण्यात आलेल्या अतिसंवेदनशील भागात पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना पुणे वनपरिक्षेत्र विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर म्हणाले, वनविभागाच्यावतीने नुकताच पश्चिम घाटातील ताम्हिणी, सुधागड आणि अंधारबन येथील परिसराचा अभ्यास करण्यात आला. यावेळी पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. याभागातील महत्वाची जैवविविधता देखील नष्ट झाली आहे. तसेच पर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराने पर्यावरणाची हानी होत असल्याने प्रशासनाने त्यावर कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यापुढील काळात या परिसरात बेतालपणे वर्तन करणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.२०१३ च्या राज्य वनविभागाच्या अधिनियमानुसार ताम्हिणी घाटातील अभयारण्याची नोंद आहे. ४९.६२ चौ.कि.मी. एवढे क्षेत्रात विस्तारलेल्या हे अभयारण्य वेगवेगळ्या १२ भागात विभागले असून ते पौड, सिंहगड या पुणे वनविभागात येतात. या अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या २५ प्रजाती आहेत. विशेष म्हणजे यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘‘शेकरु’’ याचाही समावेश आहे. याबरोबरच बिबट्या, भेकर हे देखील या परिसरात आढळतात. १५० हून अधिक पक्षांच्या जाती आणि फुलपाखरांच्या ७० पेक्षा अधिक प्रजातींचे वास्तव्य आहे. घनदाट जंगल अशी ओळख असलेल्या अंधारबन हे जंगल ताम्हिणी घाटाच्या मध्यवर्ती भागापासून १३ किमी अंतरावर आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हे अत्यंत प्रसिध्द ठिकाण आहे. येथे सातत्याने हौशी पर्यटकांची वर्दळ सुरु असते. दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. काही खासगी ट्रेकर संस्था याठिकाणी ट्रेकिंगचे आयोजन करतात. साप्ताहिक सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांची गर्दी या भागात पाहवयास मिळते. प्रशासनाकडून करण्यात येणा-या कारवाईविषयी माहिती देताना खांडेकर म्हणाले की, आमच्याकडून कारवाईला सुरुवात झाली असून पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भागात गस्त घालण्यात येत आहे. कुठे अनुचित प्रकार घडताना दिसल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच साप्ताहिक सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त मनुष्यबळ वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. पर्यटकाकडून वनविभागाच्यावतीने नमुद केलेल्या कुठल्याही नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय त्यात दोषीं आढळल्यास पर्यटक अथवा संबंधित सहल आयोजकाला सहा वर्षांपर्यत शिक्षेला सामोरे जावे लागेल.
पर्यटकांसाठी ताम्हिणी, सुधागड, अंधारबन ‘‘बंद’’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 5:36 PM
पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास...१२, ४९.६२
ठळक मुद्देजैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी वनविभागाचा पुढाकारपर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराने पर्यावरणाची हानी होत असल्याने प्रशासनाचा त्यावर कडक पावले उचलण्याचा निर्णय १५० हून अधिक पक्षांच्या जाती आणि फुलपाखरांच्या ७० पेक्षा अधिक प्रजातींचे वास्तव्य