पुणे: भारतीय जनता पार्टीचाही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबाच आहे. सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, तो विषय उपस्थित करण्याचे महापालिका सभा हे व्यासपीठ नाही. विरोधकांना पुण्याच्या विकासाचे विषय मांडू द्यायचे नाहीत, त्यामुळेच ते गोंधळ घालून काम बंद पाडत आहेत. यापुढे असले वागणे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा महापौर मुक्ता टिळक व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला.महापालिकेच्या गुरूवारी झालेल्या सभेत विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मनसे यांनी घातलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महापौर टिळक तसेच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आपली भूमिका व्यक्त केली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ तसेच भाजपाचे अन्य काही नगरसेवक यावेळी उपस्थित होते. काँग्रेस राष्ट्रवादीला त्यांच्या सत्तेच्या काळात याविषयात काहीही करणे जमलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. भाजपाने या विषयाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे महापालिकेच्या व्यासपीठावर हा विषय आणण्याचे काहीच कारण नाही. तरीही बुधवारी याविषयावरून सर्वपक्षीय संमतीने सभा तहकूब केली होती. तरीही गुरूवारी पुन्हा त्याच विषयावर असा गोंधळ घालणे याचा अर्थ विरोधकांना पुण्याच्या विकासाचे विषय सभेत येऊ द्यायचे नाहीत, ते मंजूर होऊ द्यायचे नाहीत असाच होतो अशी टीका यावेळी करण्यात आली. मराठा समाजाचे आरक्षण हा विषय राजकीय नाही तर सामाजिक आहे याचेही भान विरोधकांना राहिलेले नाही. त्यांच्या प्रभागातील नागरिकांनी त्यांना पुणे शहराचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिले आहे. महापालिकेचे सभेचे व्यासपीठ त्यासाठी आहे. तिथे मराठा आरक्षणाचा विषय उपस्थित करणे म्हणजे आपल्याच मतदारांशी प्रतारणा करणे आहे, हे विरोधकांना कळलेले दिसत नाही असे महापौर म्हणाल्या. प्रत्येक सभेत काही ना काही कारण काढून कामकाज करणे अवघड केले जात आहे. यापुढे अशी गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नाही, वेळप्रसंगी कारवाईही करू असा इशारा महापौरांनी दिला.
यापुढे... ‘असे’ वागणे खपवून घेतले जाणार नाही : महापौरांचा निर्वाणीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 8:22 PM
मराठा समाजाचे आरक्षण हा विषय राजकीय नाही तर सामाजिक आहे याचेही भान विरोधकांना राहिलेले नाही. यापुढे अशी गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नाही. वेळप्रसंगी कारवाईही करू असा इशारा महापौरांनी दिला.
ठळक मुद्देभारतीय जनता पार्टीचाही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबाच आहे. सरकार त्यासाठी प्रयत्नशील