शिवाजी आतकरी- खेड : आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेत मेगाभरती सुरु आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मेगा गळतीने पछाडले आहे. परंतु, या पक्षांतरांमुळे जसे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते अस्वस्थ आहे तसेच शिवसेना भाजपाची अवस्था पण फार आनंदी आहे असे नाही. कारण या आयारामांमुळे निष्ठावंतांसमोरचा पेच वाढतो आहे. याचे उत्तम उदाहरण खेड तालुका शिवसेनेत पाहायला मिळते आहे. तिथे सारे काही आलबेल असल्याचे चित्र दिसत नाही.
खेड तालुका शिवसेनेत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. खेड तालुक्यातून चार जणांनी शिवसेना भवनात मुलाखती दिल्या आहेत. त्यात आमदार सुरेश गोरे, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, तालुका प्रमुख रामदास धनवटे व माजी तालुकाप्रमुख ऍड. गणेश सांडभोर यांचा त्यात समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. या चौघांमध्ये राम गावडे, ऍड गणेश सांडभोर हे कट्टर शिवसैनिक असून प्रथमपासून शिवसेनेत आहेत. रामदास धनवटे हेही कडवे सैनिक आहेत मात्र तालुक्याच्या राजकीय साठमारीत ते सेनेपासून काहीकाळ अलिप्त होते. आमदार सुरेश गोरे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. दरम्यान, निष्ठावंत सैनिक व राजकीय बेरजेत अलिकडे पक्षात आलेल्यांमध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुलाखती समाधानकारक झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, लोकसभा निवडणुकीतील अपयश, मतदारांमधील चर्चा, निवडून येण्यासाठी आवश्यक क्षमता या अनुषंगाने इन कॅमेरा पक्ष निरीक्षकांसमोर मुलाखती झाल्या. या मुलाखतींमधून मतदारसंघाचा आढावा घेत निरीक्षकांनी उमेदवारांची चाचपणी केली. आमदार सुरेश गोरे यांच्या रूपाने खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघास शिवसेनेचा आमदार मिळाला. बिगर वादग्रस्त त्यांची कारकीर्द राहिली. शिवसेनेची ताकद गेली पंधरा वर्षे वाढत असताना लोकसभा निवडणुकीत खेड तालुक्यातून सेनेची झालेली पीछेहाट त्या पक्षासाठी धोक्याची घंटा मानण्यात येते. उमेदवारीसाठी मुख्य दावेदारी सुरेश गोरे यांचीच मानली जात आहे. असे असले तरी शिवसेनेने पानटपरीवाल्यास मंत्री केल्याचे उदाहरण आहे. या न्यायाने निष्ठावंत हा निकष लावला गेल्यास जिल्हाप्रमुख व अनेक निवडणुकांचा अनुभव असणाऱ्या राम गावडे यांचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो. विनम्र स्वभाव व तालुक्याची संपूर्ण माहिती, निवडणुकांचा अनुभव ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते. ऍड गणेश सांडभोर तालुका प्रमुख असताना त्यावेळी भरगच्च कार्यक्रम तालुकाभर झाले. याच काळात संघटनात्मक बांधणी तालुक्यात अधिक प्रभावी झाली तसेच पहिला सेनेचा आमदार सुरेश गोरे यांच्या रूपाने तालुक्यास मिळाला. उमेदवारीसाठी उच्च शिक्षित गणेश सांडभोर यांनी आपली डावेदारीह पक्षाकडे सांगितली आहे. रामदास धनवटे हे सेनास्टाईल आक्रमक नेतृत्व आहे. विविध आंदोलने यातून आक्रमक भूमिका मांडणारे रामदास धनवटे यांनीही तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत सेनेचे संघटन करून ते कायम दखलपात्र राहिले. धनवटे हेही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. पक्षीय उलाढाल, युती- आघाडीची समीकरणे यात मोठा बदल झाला नाही तर या चॊघांपैकी एकास उमेदवारी मिळेल, असे दिसते. अर्थात सुरेश गोरे यांचे या श्रेयनामावलीत नामांकन अग्रभागी असेल. तालुक्यातील राजकीय कानोसा घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जशी काहीशी धुसफूस आहे,वतशी सेनेतही सुप्तपणे दिसते. यावर उघडपणे कोणी बोलत नसले तरी निष्ठावंत व अलीकडे पक्षात आलेले असे सुप्त मतभेदाचे वर्णन करावे लागेल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुक्यातून आठ तर सेवेतून चार जणांनी पक्षाकडे मुलाखती दिल्या आहेत.