पुणे : हेल्मेट सक्तीसाठी आक्रमक असलेले पुणे पोलीस वर्षाअखेरीस नरमले आहे. १ जानेवारीपासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात येणार नसली तरी हेल्मेट न घालणा-या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरूच रहाणार आहे, अशी स्पष्ट भूमिका पोलीस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी घेतली.
नवीन वर्षात गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे व महिलांची सुरक्षा वाढवून शहर आणखी सुरक्षित करण्यावर आणि वाहतुक कोंडी फोडून अपघातांची संख्या कमी करण्यावर भर असेल, अशी माहिती आयुक्तांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हेगारी व वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी काय करता येईल, यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या व्हाटस्अपवर सुचना कराव्यात, असे आवाहान यावेळी आयुक्तांनी केले. या सुचनांचा अभ्यास करून, यावर काय उपाय काढता येतील याचा विचार करण्यात येणार आहे. शहरात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यास शहरातील विविध संघटना व नागरिकांकडून विरोध सुरू झाला होता. त्यामुळे त्यांनी सक्तीबाबत मौन बाळगत कारवाईवरची भूमीका ठाम असल्याचे सांगितले.
पुढील काळात गुन्हे उघडकिस आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यात येणार आहे. यासाठी सीसीटिव्ही, ब्रेथअॅनलाझर आदींचा उपयोग करण्यात येईल. कोअर पोलिसींग, नागरिकासोबत चांगले संबंध, सामाजिक तसेच संस्थेकडून सूचना मागवून घेवून त्यावर काम येणार आहे. सध्या काही सुचना आल्या आहेत. यात गुन्हा नियंत्रण, महिला सुरक्षा, वाहतूक व महाविद्यालयीन युवकांच्या समस्या यांचा समावेश आहे. शहरातील ब्लॅक स्पॉटचा अभ्यास करून उपाय योजना करण्यात आली आहे.
शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असून हे कमी करण्यासाठी काम सुरू आहे. गेल्या वर्षी ८ हजार १११ अपघात झाले आहे. पुढील वर्षी हे कमी करायचे आहेत. २८ डिसेंबर रोजी ५ हजार पेक्षा जास्त दुचाकी चालकावर कारावाई करण्यात आली, असे आयुक्तांनी सांगितले