लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊन लागणार का याबद्दल पुणेकरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असणारा संभ्रम शुक्रवारी (दि. १२) दूर झाला. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या प्रशासकीय बैठकीनंतर पुण्यात लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट झाले. लॉकडाऊनचा निर्णय न घेणाऱ्या अजित पवारांनी रात्री दहा ते सकाळी ६ या वेळेत मात्र पुणे पूर्ण लॉक करण्याची सूचना प्रशासनाला दिली.
पवार यांनी या बैठकीत शाळा आणि महाविद्यालये येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच शहरातील उद्यानेही संध्याकाळी बंद ठेवण्याची सूचना केली. लग्न समारंभ, धार्मिक सोहळे इतर कार्यक्रमांना ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठा, दुकाने, मॉल आणि चित्रपटगृहेदेखील रात्री दहापर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट्स फक्त ५० टक्के उपस्थितीच चालू ठेवण्याचीही ताकीद पवारांनी केली.
गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो, असे वक्तव्य केले होते. पुण्यात गुरुवारी एका दिवसातच दीड हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. नुकत्याच सादर केलेल्या पाहणी अहवालात हॉटेल, मॉल तसेच शाळा, कॉलेजांमुळे संख्या वाढत असल्याचाही अहवाल सादर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू होण्याची भीती पुणेकरांना वाटत होती. मात्र तूर्तास हे संकट टळलेले आहे.
चौकट
‘एमपीएससी’चा अध्यक्ष अजून नाही
‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी गुरुवारी (दि. ११) राज्यभर रस्त्यावर उतरले. या संदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी पवार म्हणाले, “मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही.” माझ्या मते एमपीएससीचा विषय आता संपलेला आहे. काल जे काही घडले दिले ते दुर्दैवी होते. विद्यार्थ्यांच्या संताप आणि भावना योग्यच आहेत. एमपीएससीने आज जाहीर केलेल्या २१ तारखेला परीक्षा होतील. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.