पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकही मॉल उघडणार नाही : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 06:00 PM2020-04-25T18:00:50+5:302020-04-25T18:06:10+5:30

रूग्णसंख्या वाढल्यास बालेवाडी क्रिडा संकूल उपलब्ध करून देणार

No mall to open in Pune and Pimpri-Chinchwad: Ajit Pawar | पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकही मॉल उघडणार नाही : अजित पवार

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकही मॉल उघडणार नाही : अजित पवार

Next
ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू दर कमी करणे आवश्यक

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ताळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत, रूग्णसंख्या वाढल्यास शिवछत्रपती क्रीडा संकुल ऊपलब्ध करून देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी प्रशासकीय अधिकार्यांच्या बैठकीत सांगितले. या सर्वच भागातील एकही शॉपिंग मॉल सुरू होणार नाही असे त्यांनी बजावले.
   पुण्यातील विधानभवनात पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील याच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पवार यांनी सर्व प्रमुख अधिकार्यांकडून पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध ऊपायांची माहिती घेतली. रूग्णसंख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली व आवश्यक त्या सर्व कडक उपायांचा अवलंब करावा असे सांगितले.      
   पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू दर कमी करणे आवश्यक आहे. या भागात गर्दी होऊ नये ,यासाठी येथील शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात
येऊ नयेत. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. शहरातील रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांना अन्नधान्य व अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे.  
प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले निर्बंध पाळून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले. ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट करून पवार म्हणाले, रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास त्यांच्यावर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे. गरज भासल्यास शिवछत्रपती क्रीडा संकुलाची इमारत व शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देता येईल.अन्य जिल्ह्यातील मजुरांच्या स्थलांतराबाबत संबंधित जिल्हाधिका-यांनी एकमेकांशी समन्वय साधून निर्णय  घेण्याची सुचना त्यांनी केली.
सरकारच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाली आहे, असे सांगून याबाबत योग्य तो निर्णय होईल, अशी माहितीही पवार यांनी दिली.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागातील कोरोना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांसोबत बैठका घेऊन नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.महापालिका आयुक्त शेखर गायकवाड,जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई , पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आपापले विभाग कोरोना प्रतिबंधासाठी करत असलेल्या कामाची माहिती दिली. 

Web Title: No mall to open in Pune and Pimpri-Chinchwad: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.