लोकमत न्यूज नेटवर्क
ओतूर : अंतर्गत, तसेच जिल्ह्याबाहेर नागरिकांना प्रवास करता यावा, यासाठी महामंडळाच्या एसटी बसला परवानगी देण्यात आली आहे. कोरोना नियमावलीचे पालन करणे अपेक्षित असताना या नियमांना स्थानक परिसर, तसेच एसटीच्या आतही हरताळ फासला जात आहे. मास्क, शारीरिक अंतर राखने बंधनकारक असताना प्रवासी, चालक, वाहक यांच्या तोंडावरचा माक्स हा खाली अथवा कानाला अडकलेला असतो. यामुळे ग्रामीण भागातील बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा दर हा ८ च्या घरात आहे. यामुळे ग्रामीण भागातील निर्बंध उठण्यास आणखी कालावधी जावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात तिसऱ्या स्तरावरील निर्बंध लागू आहेत. जोपर्यंत बाधितांचा दर हा ५ टक्क्यांच्या आत आल्याशिवाय निर्बंध शिथिल होणार नाहीत. ग्रामीण भागाती अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. दळणवळणासाठी कोरोना नियमावलीचे पालन करत एसटी महामंडळाला परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्याबाहेर जाण्यास बससेवा सुरू आहे. मात्र, या बसमध्ये कोरोना नियमावलीचे पालन होत नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे. कल्याण, आळेफाटा मार्गे संगमनेर एसटीमध्ये प्रवाशांचे मास्क हे तोंडावर न ठेवता कानावर तसेच हनुवटीर होते. चालक आणि वाहक यांचेही मास्क हे तोंडावर नव्हते. काही स्थानकावर प्रवासी बसमध्ये शिरले. मात्र, बसमध्ये शिरताच त्यांनीही मास्क काढले. काहींना बसायला जागा नव्हती. काही प्रवासी हे उभे होते. यामुळे बसच्या आत शारीरिक अंतराच्या नियमांना हरताळ फासला गेला होता.
----
‘लोकमत’चा एसटीप्रवास - माळशेज-आळेफाटा-संगमनेर
वेळ -दुपारी २ वाजता
प्रवासी - ३३
----
प्रवासात किती वेळ तोंडावर मास्क?
चालक : या बसच्या चालकाच्या तोंडावर प्रवासाच्या दरम्यान मास्क नव्हता. त्याचा मास्क हा गळ्यात अडकवलेला होता. स्थानकावर काही काळ थांबल्यावर मास्क तोंडावर व त्यानंतर पुन्हा मास्क गळ्यात अडकवून उभा होता. बस चालवतानाही मास्क न घालनेच त्याने पसंत केले होते.
वाहक : वाहकाच्या तोंडावर तिकिटे घेताना मास्क होता. मात्र, जागेवर बसल्यावर पुन्हा मास्क त्याने खाली काढला. प्रवासादरम्यान काही काळ मास्क तोंडावर तर काही वेळ खाली करणे असे वाहकाचे सुरू होते.
प्रवासी : गाडीत बसणाऱ्या, तसेच उतरणाऱ्या बऱ्याच प्रवाशांच्या तोंडावरचे मास्क हे गळ्यात अडवकवले होते. प्रवासी जागेवर बसताच हे मास्कही त्यांनी काढून ठेवले होते. मोजक्याच प्रवाशांच्या गळ्यात हे मास्क लावलेले होते. काही एकमेकांपासून अंतर राखत तसेच सॅनिटायझर वापरत काळजी घेत होते. तर काही मात्र, बिनधास्त मास्क न लावता सीटवर पहुडले होते.
-------
प्रवास -ओतूर ते आळेफाटा वेळ दुपारी २ वाजता माळशेजमार्गे कल्याण-नगर बस आली. या बसमधून ११ प्रवासी उतरले. काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क नव्हते. ते गळ्यात अडकवले होते. या बसममधून कल्याणहून आलेले दोन माणसे व ३ लहान मुले उतरली. त्यांनी मास्क लावलेले होते.
बस आळेफाटा बसस्थानकावर थांबली तेव्हा तेथे ९ प्रवासी उतरले.
बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करणारे अनेक प्रवासी मास्क विना उभे होते.
बसची प्रतीक्षा करणारे प्रवासी शारीरिक अंतराचे पालन करीत नव्हते. आळेफाटा बसस्थानकावर पुणे-नाशिक बस आली ती पूर्ण क्षमतेने भरलेली होती. माळशेज मार्गाने नालासोपारा-संगमनेर बस आली. त्या बसचालकाच्या तोंडावर मास्क नव्हते.
वाहकाने मास्क लावले होते. या बसमध्ये सुमारे १३ प्रवासी होते. त्यातील कित्येकांनी नुसते मास्क गळ्यात अडकवले होते. काहींनी मास्क लावले होते. पण नाक उघडेच होते.
येथे काही मजूर महिला चढल्या. त्यांनी साडीच्या पदराने तोंड व नाक झाकले होते.
ही बस बोटा येथे थांबली. तेथे त्या मजूर महिला उतरल्या.
आळेफाटा बस स्थानकावर नगर, पुणे, नाशिक धुळे आदी ठिकठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ असते. बस आली की प्रवासी बस व बसण्यासाठी जागा मिळण्यासाठी लोटालोटी होते. यावेळी शारीरिक अंतराच्या नियमांचा फज्जा उडतो.
फोटो :