लक्ष्मण मोरे
जवळपास वर्षभरानंतर होत असलेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडवला आहे. महापालिकेने सोय करून सुद्धा नगरसेवकांनी डिस्टंसिंग न पाळता नियमांना हरताळ फासला आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षानंतर सर्वसाधारण सभेचे कामकाज जवळपास ठप्प झालं होतं. सर्वसाधारण सभा भरण्यावरून पुणे महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणही रंगलं होतं. अखेर ही सभा भरवायला गेल्या आठवड्यात परवानगी मिळाली. 50% नगरसेवकांच्या उपस्थितीत सभागृहामध्ये कोरोना नियमांचे पालन करून सभा भरवली जाईल असा आदेश काढण्यात आला होता. याच अनुषंगाने महापालिकेनेही नव्या आणि जुन्या अशा दोन सभागृहांमध्ये नगरसेवकांच्या बसण्याची सोय केली होती.
नव्या इमारतीतील सभागृहात काही नगरसेवक महापालिका आयुक्त आणि अधिकारी वर्ग बसला होता, तर जुन्या सभागृहात काही नगरसेवक बसले होते. मुख्य सभेचे कामकाज नव्या सभागृहातून चालवले जात होते. पण या सगळ्या सोयी आणि नियमांना नगरसेवकांनी काही वेळातच हरताळ फासण्याचा पाहायला मिळालं. इकडे खुर्च्यांची सोय केलेली असताना देखील नगरसेवक नियम भंग करून एकमेकांच्या शेजारी बसलेले पाहायला मिळाले. नगरसेवकांनी इतक्या लोकांमध्ये बसलेले असताना ही मास्क देखील काढून ठेवला.यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश आहे.
सर्वसामान्यांना दंड आकारणार या पालिका प्रशासनाच्या बड्या अधिकाऱ्यांच्या समोरच नियमभंग होत होता आणि त्यामुळे लोकप्रतिनिधींना नियमांमध्ये सूट आहे का काय असा सवाल उपस्थित केला जात होता. आता महापालिकेचे अधिकारी या नगरसेवकांवर काही कारवाई करतात का ते पहावं लागेल