राजू इनामदार-पुणे: पक्षशिस्तीचा भंग करणारा नेता कितीही मोठा असो, भारतीय जनता पार्टीत त्याला कधीही माफ केले जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले अशीच पुण्यातील एकनाथ खडसे, पंकजा मुंडे समर्थकांची भावना आहे. त्यामुळेच या नेत्यांचे समर्थक असूनही त्यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याच्या विरोधात उघडपणे बोलायला कोणीही तयार नाही.खडसे यांच्यापेक्षाही पंकजा यांना मानणारा बराच मोठा गट पुण्यात आहे. त्यात आमदार माधुरी मिसाळ यांच्यापासून अनेक आजीमाजी नगरसेवक, ज्येष्ठ पदाधिकार्यांचा समावेश आहे. राज्यात सत्ता, त्यात पंकजा यांना मंत्रीपद यामुळे हा गट सुखावला होता. आता पंकजा यांचे स्थान धोक्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने हा गटही धास्तावला आहे.पंकजा यांनी मंत्री असतानाही पक्षाच्या नेतृत्वाविरोधात छुपी आघाडी चालवली होती. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तर त्यांनी जवळपास जाहीरपणे बंडाचा झेंडा फडकावला. त्यामुळेच विधानपरिषदेसाठी त्यांचा विचारही झाला नाही.याचा अर्थ स्पष्ट करताना पक्षाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी व मुंडे यांचे समर्थक नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर म्हणाले, भाजपात बेशिस्त चालतच नाही. कोणी कितीही मोठा असला तरीही नाही. त्यामुळेच पंकजा यांना बाजूला ठेवण्यात आले. असे करताना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील पक्षाचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत हेही स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आता पक्षात पदे भूषवणारे कोणीही मुंडे समर्थक पंकजा यांना उघडपणे सहानुभूती दाखवणार नाही.पंकजा किंवा एकनाथ खडसे ज्या मास बेसचा दावा इतकी वर्ष करत होते तो मास बेस आता राहिला नाही हेही पक्षश्रेष्ठींच्या मनावर बिंबवण्यात मुंडे विरोधकांना यश आले आहे असे मत गल्ली ते दिल्ली विविध पदे भुषवणाऱ्या आणखी एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. ते म्हणाले, आपली ताकद पक्षामुळे आहे हे काहीजणांच्या लक्षात येत नाही. कार्यकर्तेही त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतात. पक्षातले आपले खरे स्थान काय याचे भान नेत्यांनी ठेवायला हवे.ते राहिले नाही की काय होते याची खडसे, मुंडेच नाही तर आणखी बरीच उदाहरणे राज्यात आहेत अशी टिपणीही या नेत्याने केली.पंकजा यांना मानणारे नगरसेवकही पुण्यात संख्येने बरेच आहेत. तेही पंकजा यांना पक्षाने असे बाजूला ठेवल्याने धास्तावले आहेत. पुण्यात महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्याचे सगळे निर्णय राज्यातील श्रेष्ठीच घेतात. त्यांच्यापैकीच एक असलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळेच चुकूनही वावगा शब्द किंवा पंकजा यांना पाठिंबा दर्शवणारी एखादी क्रुती आपल्याकडून होऊ नये म्हणून हे नगरसेवक सावध आहेत.
कोणी कितीही मोठा नेता असला तरी भाजपात बेशिस्तपणाला माफी नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 7:58 PM
केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील पक्षाचे मुख्यनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत हे स्पष्ट केले आहे.
ठळक मुद्दे मुंडे, खडसे समर्थकांची भावना: डावलण्याचे राजकारण पक्षाची हानी करणारे