पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळ हे महाराष्ट्रात महत्त्वाचे विमानतळ आहे. भोवतालच्या दहा जिल्ह्यांना ते जोडणारे आहे. तसेच पुणे आणि परिसरात उद्योगांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांना चांगली सुविधा देणारे टर्मिनल गरजेचे होते. म्हणून या विमानतळ विस्तारीकरणासाठी गेली तीन वर्षे प्रयत्नशील आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांचा विमान प्रवास अधिक सुखकर होईल. शरद पवारांनी कितीही विमानतळ बांधावीत पण पुणे विमानतळाचं स्थलांतर अजिबात करणार नाही. असे विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि खासदार गिरीश बापट यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलंय
आज गुरुवारी (२४ मार्च) सकाळी विमानतळ प्रशासन आणि खासदार गिरीश बापट यांच्याकडून नव्या विमानतळ टर्मिनलबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद झाली.
बापट म्हणाले, पुणे विमानतळ हे प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे हे विमानतळ हलविण्याचा आमचा कोणताही विचार नाही. यावेळी त्यांनी पुरंदर, बारामती येथे नवे विमानतळ उभारण्याच्या चर्चांचं खंडनही केलं.
प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज टर्मिनलची गरज आता पूर्ण होणार
''सध्याच्या विमानतळावरील टर्मिनल केवळ 22 हजार चौरस मीटर आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांची आणि विमान कंपन्यांची मोठी गैरसोय होते. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 80 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज टर्मिनलची गरज होती. ती आता पूर्ण होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.''