पिंपरी : ‘कुत्तें भोंके हजार, हत्ती चले बाजार’, असे म्हटले जाते. भोसरीत २०१४ नंतर विकासकामे झाली आहेत. त्यामुळे कोणी कितीही भुंकले तरीही आपली कामे झाकली जाणार नाहीत. शहरातील रेडझोन, ब्लू लाईन आणि रेड लाईनचे प्रश्न सोडवू. महाविकास आघाडी मतांचे ध्रुवीकरण करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भोसरी मतदारसंघातील महायुतीतील भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. १६) चिखली येथे प्रचारसभा झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, भोसरी मतदारसंघातील विरोधकांच्या मनात मळमळ आहे. मात्र, महेश लांडगे यांना सामान्यांची हळहळ वाटते. महाविकास आघाडी सरकारला शास्तीकराचा प्रश्न सुटत नव्हता. महेश लांडगे माझ्याकडे आले आणि त्यांनी मागणी केली. आपण शास्तीकर रद्द केला. भामा-आसखेडचे पाणी आणण्याचा प्रश्न सोडवला. वेस्ट टू एनर्जीमार्फत वीज निर्मिती केली. यासारखी अनेक विकासकामे भाजपने केली. या सगळ्या कामांचा पाठपुरावा लांडगे यांनी केला.
संविधान बचावचे फेक नॅरेटिव्ह
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभेतील संविधान बचावसारखे खोटे नॅरेटिव्ह चालले नाहीत. त्यामुळे आता नवे फेक नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत. आमच्या सत्ताकाळात महाराष्ट्र गुजरातपेक्षाही पुढे होता. मात्र, त्यांच्या सत्ताकाळात गुजरात महाराष्ट्रापेक्षा पुढे होता. खोटे कोण बोलत आहे, हे तुम्ही ओळखा. मायक्रोसॉफ्टचे कॅम्पस पुण्यात येणार आहे. त्यामुळे ५० हजारावर रोजगार मिळणार आहे. आमचे सरकार उद्योगांना प्रोत्साहन देणारे सरकार आहे. आम्ही त्यांच्याकडून हप्ते घेत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे.
मतांसाठी धर्मयुद्ध करा
फडणवीस म्हणाले की, मुस्लिमांना १० टक्के आरक्षण द्या, २०१४ ते २०२४ दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या दंग्यांमधील मुस्लीम समाजातील आरोपींवरील खटले मागे घ्या, अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांनी या मागण्या मान्य करणार असल्याचे पत्र दिले आहे. त्याच मागण्या मान्य झाल्याने आता शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि राहुल गांधी हे त्यांचे सेनापती असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांना व्होट जिहाद करण्याचे आवाहन केले जात आहे. ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ अशी ही निवडणूक झाली आहे. आज झोपून राहिलो तर हे जगू देणार नाहीत. मतांचे धर्मयुद्ध करा, त्यामुळे आपले सरकार येईल.