पुणे: शिवशक्ती-भीमशक्ती आणि लहूशक्ती ही एकाच शक्तीची रूपे आहेत. या तिन्ही शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्रात नव्हे, तर देशात एक प्रचंड ताकद निर्माण होईल. म्हणूनच शिवशक्ती-भीमशक्ती व लहूशक्तीचा लवकरच मेळावा घेणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरून आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. लोकांबाबत जर मनात आस्था नसेल अशा कितीही शक्ती एकत्र येऊन काय होणार नाही असं ते यावेळी म्हणाले आहेत. पुण्यात अर्हम फौंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने 'संवाद- स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, किती ही शक्ती एकत्र आल्या तरी जन शक्तीसाठी तुम्ही काय केलं? दिव्यांगांसाठी आम्ही दहा वेळा गेलो, एकदा ही मीटिंग झाली नाही. लोकांबाबत जर मनात आस्था नसेल अश्या शक्ती एकत्र येऊन काय होणार नाही. मंत्री मंडळ विस्तार हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. दिव्यांग मंत्रालयासमोर विस्तार ही लहान गोष्ट आहे. आता हे वंचितांचा विस्तार झाला पाहिजे. विस्तार कधी होणार हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना विचारलं पाहिजे.
भाजपमध्ये छत्रपतींचा अपमान करण्याची स्पर्धा लागलीय...
संजय राऊत यांचं म्हणणं काही अंशी खरच आहे. मी त्यांच्या बाजूने आहे. काही लोक बोलतात, कुठल्याही महापुरुषांबद्दल बोलणे उचित नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. सगळ्याच गोष्टीवर कारवाईची गरज नसते. जे बोलतात त्यांना हे समजल पाहिजे. स्वतः ची नाहीतर जनाची तर असली पाहिजे. राज्यपालांनी यावर स्पष्टीकरण देणे महत्वाचं आहे. सगळे प्रश्न कारवाईने सुटत नाही.