पुणे: ‘देशात जेव्हा सामान्य व्यक्तींवर अन्याय होतो, तेव्हा लेखणीद्वारे साहित्यिकांना त्याविरोधात आवाज उठवायचा असतो. कारण ईश्वराने तुम्हाला सर्जनशीलतेची देणगी, एक शक्ती दिलेली आहे. ती तुम्ही प्रामाणिकपणे वापरून लिहिले पाहिजे. साहित्यिकांनी ‘मन की बात’ केली पाहिजे, असे आवाहन साहित्य अकादमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक माधव कौशिक यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, मसापचे विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह अंजली कुलकर्णी उपस्थित होते.
कौशिक म्हणाले, राजकीय सत्ता आणि साहित्यिक कधीच एकत्र चालू शकत नाहीत. कारण राजकीय सत्ता चुकली आणि त्यांनी सामान्य लोकांवर अन्याय केला, तर साहित्यिकच तो अन्याय लेखणीद्वारे मांडू शकतात. राजकीय नेत्यांनी साहित्यिकांचा कितीही सत्कार केला, तरी तुम्ही कधीच सत्य मांडायचे थांबवू नका, असा सल्ला कौशिक यांनी दिला.
‘लोकमत’च्या संपादकांचा गौरव
विशेष ग्रंथकार पारितोषिकांमध्ये दैनिक ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांचाही समावेश होता. त्यांना आशा संत पारितोषिक प्रदान करून गौरव करण्यात आला.