पुणे : घरात लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. अन्यथा लहान मुले काय खातील, काय तोंडात घालतील, याचा नेम राहत नाही. कोणी सेफ्टी पिन गिळली, कोणाच्या नाकात शेंगदाणा अडकला, तर कोणी खेळण्यातील बटण, बॅटरी गिळली असे अजब प्रकार पहायला मिळतात. एखादी वस्तू अन्ननलिका किंवा श्वसननलिकेत अडकल्यास लहान मुलांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते. एंडोस्कोपी किंवा ब्राँकोस्कोपी करून वस्तू शरीरातून बाहेर काढल्या जातात. स्कोपीमुळे शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले आहे.
लहान मुलांना नव्या वस्तू हातात घेऊन पाहण्याची, चव घेण्याची, तोंडात किंवा नाकात घालण्याची सवय असते. मोठ्या माणसांचे लक्ष नसताना मुले क्षणार्धात काहीतरी उद्योग करून ठेवतात आणि पालकांच्या चिंतेत भर पडते. मुलांनी एखादी वस्तू गिळल्यास अन्ननलिकेतून ती जठरात आणि तिथून आतड्यापर्यंत जाते. विशेषत:, खेळण्यांमधील ॲसिड बॅटरी किंवा बटण बॅटरी गिळल्याची उदाहरणे समोर येतात. आम्लधर्मी वस्तूंमुळे अन्ननलिकेवर व्रण उठण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांनी एखादी वस्तू गिळल्यास त्यांना त्वरित केळी खायला देण्याचा सल्ला दिला जातो. बरेचदा, शौैचावाटे वस्तू बाहेर पडण्याची शक्यता असते, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग यांनी दिली. अन्ननलिकेतून एखादी वस्तू पुढे गेल्यास एंडोस्कोपी करून ती काढली जाते, असेही ते म्हणाले.
लहान मुलांच्या नाकात एखादा पदार्थ किंवा वस्तू गेल्यास ब्राँकोस्कोपी करून ती काढली जाते. औैंध जिल्हा रुग्णालयात पिडीॲट्रिक सर्जन नसल्याने ही सुविधा उपलब्ध नाही. एखादी वस्तू वरच्यावर असल्यास ओपीडीमध्ये उपचार करता येतात. मात्र, गुंतागुंत निर्माण झाल्यास ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठवले जाते.
------------------
एखादी वस्तू किंवा पदार्थ श्वसननलिकेतून पुढे गेल्यास गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते. सुरुवातीला हेमलिक पद्धतीने वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये पाठीमागून मुलाला मिठीत धरून छाती आणि पोटाच्या मधल्या भागात विशिष्ट पद्धतीने दाब दिला जातो. श्वसनमार्गात वस्तू डावीकडे किंवा उजवीकडे गेल्यास ब्राँकोस्कोपी करून वस्तू बाहेर काढली जाते. अन्यथा फुप्फुसामध्ये गुंतागुंत होऊन न्यूमोनिया होण्याचीही शक्यता असते. धातूच्या वस्तू असल्यास एक्स-रेमधून त्याचे निदान होते. सीटी स्कॅनमधूनही निदान करणे शक्य होते. स्कोपीमुळे शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी झाले आहे.
- डॉ. प्रमोद जोग, बालरोगतज्ज्ञ
-----------------
अशी घ्या मुलांची काळजी :
- लहान मुलांच्या बारीकसारीक हालचालींकडे लक्ष ठेवावे.
- बाळ रांगायला लागले की त्याच्या हातात लहान, अणकुचीदार वस्तू येणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
- लहान मुलाने नाकात किंवा तोंडात एखादी वस्तू घातल्यास घरगुती उपाय करण्यात वेळ न दवडता त्याला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जावे.