लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आपत्ती असो वा इतर विषयात आम्ही महापालिका प्रशासनासोबत कायम राहिलो आहोत. पण, आता स्थायी समितीने दिलेल्या सूचनांनुसार ‘स’ यादीसह सर्व विकासकामे मार्गी लावावीत. यात प्रशासनाच्या वित्तीय समितीची येथून पुढे आडकाठी नको, अशा स्पष्ट सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला दिल्या.
महापालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत मंगळवारी सहा विषय पत्रिकेवरील काही ठराव अंतिम मान्यतेसाठी पुकारण्यात आले. यामध्ये काही ठराव वर्गीकरणाचे होते, यात सर्वपक्षीय सभासदांनी आप-आपल्या प्रभागात विकासकामे सुचवलेली होती. त्यामुळे हे वर्गीकरणाचे विषय सप्टेंबर महिन्याच्या कार्यपत्रिकेवर घेण्यास यावेळी सभासदांनी विरोध केला. तसेच स्थायी समितीचे आदेश असतानाही वित्तीय समिती कामे रोखत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी प्रशासनास सर्व विकासकामे करण्याची सूचना केली असल्याचे आठवण या वेळी करून दिली. तर महापौर मोहोळ यांनी यापुढे कुठलीही वित्तीय समिती राहणार नाही अशा सूचना प्रशासनास दिल्या. महापौर यांच्या या सुचनेमुळे आता नगरसेवकांनी आपल्या प्रभागात ‘स’ यादीत वर्गीकरणाद्वारे सुचविलेली विविध विकासकामे प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
----------