पुण्यातले कोरोना रुग्ण वाढत असले तरी पुणे शहरात लॉकडाऊन नको अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्याबरोबरच इतर काही ठिकाणी कडक निर्बंध लावले जातील आणि आवश्यक्ता भासल्यास लॉकडाऊन चा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत दिले होते . त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही भूमिका घेतली आहे.
पुण्यात गेले काही दिवस कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सतत ५ हजार रुग्ण सापडत आहेत. रुग्णालयांमध्ये देखील रुग्ण संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल पुण्यात आढावा घेण्यासाठी आलेल्या टोपे यांनी लॉकडाऊन किंवा निर्बंध वाढवण्याचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतील असे देखील त्यांनी सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी पुण्याचा बाबतीत ही भूमिका स्पष्ट केली आहे.
मोहोळ म्हणाले " यापूर्वी सुद्धा आम्ही हीच भूमिका मांडली होती. पुण्याची परिस्थिती आटोक्यात आहे. या परिस्थिती पूर्ण लॉकडाऊन करणे योग्य नाही. आज पुण्यातली एकूण परिस्थिती पाहता तसेच टाटा आणि आयसर ने केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट केले होते की आत्ता लागू केलेल्या निर्बंधांचीच अंमलबजावणी नीट करणे आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा मार्ग नाही असे त्यांनी ही सांगितलं. याबाबत तीन पातळ्यांवर काम केले जाऊ शकते. रुग्ण संख्या झपाट्याने वाढतेय हे पाहता आरोग्य यंत्रणा उभी करणे, लसीकरण वाढवणे असेल तसेच टेस्टिंग वाढवणे हे एका बाजूला करू. अधिकचे निर्बंध वाढवू पण लोकडाऊन करणे योग्य नाही अस मला वाटतं."