पुणे : द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनीज सेक्रेटरीकडून (आयसीएसआय) जून २०२१ मध्ये घेतली जाणारी ‘सीएस’ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी संपणार आहे, त्यांची नोंदणी पुढील परीक्षेपर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही, असे ‘आयसीएसआय’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘आयसीएसआय’मार्फत सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस फायनल या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून नोंदणी केले जाते. ही नोंदणी पाच वर्षे किंवा पाच संधीपर्यंत ग्राह्य धरली जाते. या कालावधीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागते. त्यानंतरच त्यांना परीक्षेच्या पुढील संधीचा लाभ घेता येतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या सीएस अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत यंदा या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधित विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
जून महिन्यापूर्वी आणि जून महिन्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीची मुदत संपणार आहे, त्यांना नियमानुसार नवीन नोंदणी करावी लागणार होती. परंतु, पात्र विद्यार्थ्यांना जुन्या नोंदणीवरच परीक्षा देता येणार असून, ही सुविधा केवळ जून २०२१ मधील पुढे ढकललेल्या परीक्षांपुरतीच लागू राहणार आहे.