पुणे: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना आजाराने बाधित रूग्णांना खाण्यापिण्याचे कसलेही पथ्य नाही. वेळेवर औषधोपचार करण्याबरोबरच या रूग्णांच्या जेवणाचीही काळजी रूग्णालय व्यवस्थपनाकडून दररोज घेतली जात आहे. पालिकेच्या डॉ नायडू रूग्णालयात कोरोना बाधित व संशयित अशा दोन्ही प्रकारचे १०० पेक्षा जास्त रूग्ण आहेत. संशयित रूग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. बाधित रूग्णांसाठी वेगळा कक्ष आहे. या सर्व रूग्णावर आवश्यक ते औषधोपचार नियमीतपणे केले जात आहेत. त्याबरोबरच त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली जात आहे. या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून असलेले पालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ संजीव वावरे म्हणाले, या रूग्णांना खाण्यापिण्याचे पथ्य नाही, मात्र त्यांना घरचे जेवण घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. रूग्णालयात वर्दळ वाढेल म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. या सर्व रूग्णांच्या जेवणाची व्यवस्था रूग्णालय व्यवस्थापन करत आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहे.सकाळी त्यांना चहा देण्यात येतो. त्यानंतर दुपारी व सायंकाळी त्यांना जेवण दिले जाते. त्यात नेहमीची पोळीभाजी भात आमटी असते. दुपारचा चहाही देण्यात येतो. त्याबरोबर बिस्किटे असतात. मात्र ती नसतील तर फक्त चहा देण्यात येतो. थंड असे काहीही पिण्यास, खाण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. त्यांची प्रतिकार शक्ती कमी होऊ नये, त्यात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. बाधित व संशयित अशा दोन्ही रूग्णांचे मनोधैर्य टिकवण्यासाठीही प्रयत्न केले जातात. ते चांगले आहे अशी माहिती डॉ वावरे यांनी दिली.इतक्या लोकांचे जेवण रूग्णालयात तयार करणे शक्य नाही. त्यामुळे ते बाहेर बनवले जाते व तिथून फूड पँकेटस तयार करून ते रूग्णालयात आणले जातात. नंतर त्यांचे वाटप होते असे ते म्हणाले.
पुण्याच्या नायडू रुग्णालयातील कोरोनाबाधित व क्वारंटाइन रूग्णांना नाही कसले पथ्यपाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 2:33 PM
पालिकेच्या डॉ नायडू रूग्णालयात कोरोना बाधित व संशयित अशा दोन्ही प्रकारचे १०० पेक्षा जास्त रूग्ण
ठळक मुद्दे जेवणाची घेतात काळजी: सर्वांना दिली जातात फुड पॅकेटस् थंड असे काहीही पिण्यास, खाण्यास त्यांना मनाईबाधित व संशयित अशा दोन्ही रूग्णांचे मनोधैर्य टिकवण्यासाठीही प्रयत्न