पुणे :पुण्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्काराच्या कार्यक्रमात आजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार शाब्दिक फटकेबाजी बघायला मिळाली. खात्रीने सांगतो, ' पुण्यातल्या कोणत्याच काकडेंवर कोणाचाही''अंकुश' चालू शकत नाही अशा शब्दात त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि सभागृहात एकच हशा पिकला.
पुणे शहराच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांच्या सर्वपक्षीय सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, शिवसेनेचे शशिकांत सुतार, काँग्रेसचे रमेश बागवे, मनसेचे किशोर शिंदे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, ' फडणवीस यांच्या आधी अंकुश काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी काकडे यांच्या भाषणातील धागा पकडत कोणत्याही काकडेंवर अंकुश नाही, अशी कोटी करीत अंकुश काकडे आणि संजय काकडे या दोघांवर पुणेरी स्टाईलने निशाणा साधला.
त्यांनी त्यांच्या भाषणात मोहोळ यांचे कौतुक केलेच पण महापौर पदाच्या वेदनाही बोलून दाखवल्या. ते म्हणाले की, ' भविष्यातला उमदा नेता म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. महापौर पद निभावणं कठीण आहे. मागच्या जन्मी ज्याने पाप केलं तो नगरसेवक बनतो आणि महापाप केलं तो महापौर बनतो. या पदावर काम करताना कौतुक कमी आणि शिव्या जास्त ऐकायला मिळतात. मात्र काम करताना समाधान मिळतं, अडचणी दूर करायला मिळतात. त्यामुळे विलक्षण अनुभव असतो' असं सांगायलाही ते विसरले नाहीत.