लोणावळा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचे समर्थन या देशात कोणीही करू शकणार नाही. मध्य प्रदेशात त्यांच्या नावाने कोणी शाळा काढत असेल तर ते चुकीचे आहे, असे स्पष्ट मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चा कार्यसमिती बैठकीच्या समारोप सत्राला देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करण्यासाठी लोणावळ्यात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बर्ड फ्लू हा रोग पाच राज्यांत पसरला असून, महाराष्ट्राच्या काही भागांत याची लागण सुरू झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद राहिल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आलेले असताना आता पुन्हा बर्ड फ्लूचे संकट आले आहे. या व्यावसायिकांना शासनाने मदत करणे गरजेचे आहे.
भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नवजात बालकांच्या अग्नितांडवावर बोलताना फडणवीस म्हणाले, सरकार अतिशय असंवेदनशीलपणे वागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याठिकाणी जाऊन आले; पण कुटुंबांना कोणतीही वाढीव मदत दिली नाही की, कोणावर कारवाईदेखील केली नाही. मागील सरकारने काय केले, केंद्र सरकार काय करतंय हे म्हणत बसण्यापेक्षा संवेदनशीलतेने वागून कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.