पुणे : तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या आणि घरीच एका बाळाचा जन्म झाला. पुन्हा त्रास हाेऊ लागल्याने त्यांनी थेट औंध जिल्हा रुग्णालय गाठले. रुग्णालयात आल्यावर पुन्हा दोन बाळांचा जन्म झाला. त्या तीनही बाळांवर औंध जिल्हा रुग्णालयातील ‘स्पेशल न्यूबाॅर्न युनिट’मध्ये यशस्वी उपचार सुरू असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. तीन बाळांचा जन्म ही वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मीळ केस समजली जात आहे.
नसीमा असे या महिलेचे नाव आहे. ती मूळची उत्तर प्रदेश येथील असून सध्या पुण्यात राहते. तिला आपल्या पाेटात किती बाळं आहेत याची माहिती नव्हती. तिने घरीच एका मुलाला जन्म दिला होता. नंतर ती औंध जिल्हा रुग्णालयात दि. २२ ऑगस्ट रोजी दाखल झाली. डॉक्टरांच्या तपासणीनुसार असे लक्षात आले की, तिच्या पोटात आणखी दाेन बाळं आहेत. रुग्णालयात सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी दुसऱ्या मुलीला आणि ७ वाजून ५६ मिनिटांनी तिसऱ्या मुलीला जन्म दिला. दाेन्ही मुलींचे वजन १४०० व १४५० ग्रॅम असे आहे. घरी जन्मलेल्या मुलाचे वजन १६२० ग्रॅम आहे.
घरी जन्मलेल्या बाळाला श्वास घेण्यास त्रास हाेत असल्याने त्याला आणि साेबत दाेन्ही मुली असे तिघांनाही हाॅस्पिटलच्या ‘एसएनसीयू’ विभागात दाखल केले. तिन्ही बालकांना ऑक्सिजन, सलाइन देण्यात आले. या बाळांना अकरा दिवस झाल्यानंतर त्यांचे वरचे दूध बंद केले आणि आईचे दूध देण्यात आले. आता त्या बालकांना १५ दिवस झाले आहेत. लवकरच सुट्टी हाेणार आहे, अशी मिहीती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली.
नसीमाला याआधी तीन मुली आहेत. तसेच तिची परिस्थिती गरिबीची आहे. जिल्हा रुग्णालयात २४ बालकांची क्षमता असलेल्या ‘एसएनसीयू’ कक्ष आहे. येथे प्रसूतीपूर्व जन्मलेल्या व अगदी अर्ध्या किलाे वजनाच्या बाळांवर देखील यशस्वी उपचार झाले आहेत. तसेच हे सर्व उपचार माेफत हाेतात. बाहेर या उपचारासाठी प्रतिदिन १२ ते २५ हजार इतका प्रचंड खर्च येताे.
आता बाळांची तब्येत चांगली
ही महिला गरीब असून, साडेआठ महिन्यांत तिची प्रसूती झाली. आता बाळांची तब्येत चांगली आहे. सध्या त्यांना नळीने दूध पाजणे सुरू आहे. तिळे जन्माला येणे ही दुर्मीळ घटना आहे. यापूर्वी सन २०१६ ला चार बाळ जन्माला आले हाेते. त्यानंतर हे तिळे जन्माला आले आहे. जुळ्या बाळांचे प्रमाण जास्त आहे. - डाॅ. सुरेश लाटणे, एसएनसीयू विभाग प्रमुख, जिल्हा रुग्णालय, औंध