लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह पुण्यातही पुन्हा रुग्ण वाढताना दिसत आहे. कोरोनाचे दोन डोस घेतलेले लोक अधिक बेफिकीर होताना दिसत असून ही धोक्याची घंटा ठरू शकते. यामुळेच शहर आणि जिल्ह्यात सध्याचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर “पुण्यात दुपारी चारनंतर रस्त्यावर गर्दी केल्यास नागरिकांसह पथारी व्यावसायिक व हातगाडीधारकांवर कडक कारवाई करा,” असा आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिला आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. ९) कोरोना आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, आमदार माधुरी मिसाळ, दिलीप मोहीते, राहुल कुल, अशोक पवार, सुनिल शेळके, अतुल बेनके, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
“शहरासह संपूर्ण जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी दर कमी होत असला तरी मृत्यूदर अपेक्षित प्रमाणात कमी झालेला नाही. त्यात सध्या जिल्ह्यात पन्नास लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात दोन्ही डोस घेतलेले लोक अधिक बेफिकीर झाले असून मास्क न लावता फिरताना दिसत आहे. हे खूप धोक्याचे आहे. आयसीएमआरने लसीकरण पूर्ण झाले तरी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे,” असे पवार यांनी सांगितले.
चौकट
पर्यटकांवर कडक कारवाई करा
जिल्ह्यातल्या पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी केली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे. अशा ठिकाणी कोरोनाबाबतच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. कोणत्याही परिस्थितीत नियम पाळलेच पाहिजेत. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे हे सर्वांच्याच हिताचेच आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
चौकट
आणखी त्रासाची ठेवा तयारी
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून नव्या बाधितांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याचे गेल्या पंधरवड्यातील चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापारी पेठा, व्यवसाय, मॉल आदींना दुपारी चारनंतर वेळ वाढवून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसा दिलासा मिळाला नाही. उलट अजित पवार यांनी कारवाई कडक करण्याचे आदेश दिल्याने पुणेकरांना आता प्रशासनाकडून आणखी ससेहोलपट सहन करावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे.