कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये, अजित पवारांचं 'विजयस्तंभाला' अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 09:29 AM2020-01-01T09:29:57+5:302020-01-01T09:30:06+5:30
कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज,
कोरेगाव भीमा (जि. पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. शूरवीरांची आठवण ठेवण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी सर्वांनी इथं यावं. तसेच, कुणी काहीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कुणीही विश्वास ठेऊ नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही भीमा-कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. तसेच, पोलिसांनी दक्षता घेतली आहे, काही जणांवर ते नजर ठेऊनही आहेत. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नसल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. भीमाकाठावरील कोरेगाव भीमानजीक ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटना आणि मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून 1 जानेवारीला पुण्यात भीमसागर लोटला आहे. विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी सुमारे 10 हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली. यात महार बटालियनच्या 500 सैनिकांनी पेशव्यांच्या 28 हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. त्यात महार रेजिमेंटच्या अनेक सैनिकांना वीरमरण आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी 1822 मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. 1927 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव 1 जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) रामदास आठवले, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे आनंदराज आंबेडकर, भारतीय दलित कोब्राचे अॅड. भाई विवेक चव्हाण, रिपब्लिकन जनशक्तीचे अर्जुन डांगळे, समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्षा मीरा आंबेडकर, भीमराव आंबेडकर, भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम, रिपब्लिकन युवा मोर्चा, भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र क्रांतिसेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, क्रांती मजदूर पुणे शहर, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवासंघ, भीमशक्ती युवा सेना यांच्या येथे आज सभा होणार आहेत.