भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकरमंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील नसून, आसाममधील आहे, असा दावा आसाम सरकारने केला आहे. त्यामुळे या स्थानावरून वाद निर्माण झाला आहे. भीमा नदीकाठी वसलेले ज्योतिर्लिंग हे भीमाशंकर म्हणून अनादिकाळापासून प्रसिद्ध आहे, आसाम सरकारच्या म्हणण्यावर कोणीही विश्वास ठेवू नका, असे अवाहन भीमाशंकर देवस्थानचे मुख्य पुजारी मधुकरशास्त्री गवांदे यांनी केले आहे.
आसाम राज्यातील डाकिनी टेकडीच्या कुशीत वसलेले पमोही गुवाहाटी येथील शिवलिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे श्री भीमाशंकर असून, याठिकाणी दि.१८ रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन एका जाहिरातीद्वारे आसामचे मुख्यमंत्री डाॅ. हिंमत बिसवा सरमा यांनी केले आहे.
यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत भाजपा सरकारला महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाबरोबरच महत्त्वाची तीर्थक्षेत्रदेखील हिसकावून घ्यायची आहेत. आसाममधील भाजपा सरकारच्या या आगाऊपणाचा निषेध करत असून, महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ भूमिका स्पष्ट करून आसामच्या या निंदनीय कृतीचा निषेध केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. यावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेकांनी याचा निषेध केला आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
यामध्ये काय सत्य आहे, हे भीमाशंकर देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त व मुख्य पुजारी मधुकरशास्त्री गवांदे यांच्याकडून जाणून घेतले असता, अनादिकालापासून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरमध्ये ज्योर्तिलिंग आहे. शिवपुराणात, शिवलीलामृतात याचा उल्लेख आहे. शंकराचार्यांनीदेखील सह्याद्री पर्वतरांगांतील भीमानदी काठी वसलेले भीमाशंकर यावर काव्य रचले आहे. शिवाजी महाराजांपासून याला मानपान आहेत.
आसाममध्ये भीमाशंकर असल्याचे प्रथमच आज ऐकायला मिळाले, येथील शिवलिंग मोठे आहे, तर भीमाशंकरमधील शिवलिंग शंकर व पार्वती, असे दुभंगलेले आहे. असे भेद असलेले शिवमंदिर इतर कुठेही नाही. भीमाशंकर नावाने मंदिर असले म्हणजे ज्योतिर्लिंग होऊ शकत नाही. देशातील इतर ज्योतिर्लिंगांमध्येही असेच वाद निर्माण केले गेले. यावर भाविकांनी विश्वास ठेवू नये, असे अवाहन गवांदे गुरुजी यांनी केले आहे.