कोरेगाव पार्क : इस्कॉनच्या मदतीने टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमने सुरू केलेला रोज २० हजार खिचडी पॅकेटच्या वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजातील एकही व्यक्ती उपाशीपोटी झोपू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्तकेले.टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे (टीएमसी) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया मान्यवरांना विमाननगर येथील सिम्बायोसिस एज्युकेशन कॉम्प्लेक्सच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर टीएमसीचे अध्यक्ष बी. आर. मल्होत्रा, सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आणि सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, सचिव डॉ. जयसिंग पाटील, वेकफिल्ड फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी मल्होत्रा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पाटील म्हणाले की, एकीकडे आपला देश महासत्ता बनण्याकडे वाटचाल करीत असताना, दुसºया बाजूला समाजातील गरीब लोकांची संख्या मोठी आहे. त्यातील अनेकजण उपाशीपोटी झोपतात. अशावेळी आपल्यातील संवेदनशील वृत्ती जागी ठेवून त्यांच्या पोटात अन्नाचे दोन घास जावेत, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.मुजुमदार यांनी मनोगत व्यक्त केले. मल्होत्रा यांनी प्रास्ताविक केले. जयसिंग पाटील यांनी सूत्रसंचालन केले.नोबेल पुरस्कारप्राप्त गुरुत्वीय लहरीच्या संशोधकांच्या टीममधील डॉ. संजीव धुरंधर, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप (रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी), 'आयसर'चे संचालक डॉ. के. एन. गणेश यांना विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी, प्रादेशिक परिवहन अधिकारी बी. आय. आजरी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, विमानतळ प्राधिकरण संचालक अजयकुमार यांना प्रशासकीय सेवेसाठी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. हेमंत वाकणकर, कोलंबस रुग्णालयाचे सरव्यवस्थापक डॉ. विजूराजन यांना आरोग्य सेवेसाठी, सुदर्शन जीन्सचे बन्सल सुदर्शन, सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांना उद्योगक्षेत्रातील कामगिरीसाठी, क्रिकेटपटू पूनम राऊतला खेळासाठी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना कलेसाठी, सूर्यदत्ता एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया यांना शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल, विधिज्ञ चंदन परवानी (कायदा) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आज का आनंदचे संपादक श्याम अगरवाल आणि नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबाग यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया कर्तबगार व्यक्तींना सन्मानित केल्याने इतरांसमोर आदर्श निर्माण होतो. अशा यशवंतांकडून प्रेरणा घेऊन जिद्दीने काम करण्याची स्फूर्ती मिळते. समाजातील वंचित घटकांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा.- श्रीनिवास पाटील
कोणीही उपाशीपोटी झोपू नये - श्रीनिवास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 3:02 AM