'माझ्या बहिणीवरही उपोषण करण्याची वेळ येता कामा नये', अजित पवारांनी अधिकाऱ्यांना लावलं कामाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 10:18 IST2025-04-11T10:17:54+5:302025-04-11T10:18:56+5:30
Supriya Sule Ajit Pawar News: खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्याची दखल घेत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना कामाला लावलं.

'माझ्या बहिणीवरही उपोषण करण्याची वेळ येता कामा नये', अजित पवारांनी अधिकाऱ्यांना लावलं कामाला
Ajit pawar Supriya Sule News: 'अधिकाऱ्यांना सांगितलं की, कुणालाही उपोषण करण्याची पाळी येता कामा नये, माझ्या बहिणीला पण येता कामा नये', असे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. श्रीक्षेत्र बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करावे, या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळेंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्याची दखल घेत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना कामाला लावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी ९ एप्रिल रोजी सुप्रिया सुळे यांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱरी विजयसिंह नलावडे आणि इतर अधिकाऱ्यांनी मे महिन्यात कामाला सुरूवात करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुप्रिया सुळे उपोषण सोडले.
वाचा >तळ्यात-मळ्यात न करता ठाम राहा..! अजित पवारांनी कोणाचे कान टोचले ?
पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "रस्त्याचे काम तातडीने चालू होईल. सूचना दिलेल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. पीएमआरडीएचे भिसे म्हणून प्रमुख आहेत, त्यांच्याशीही बोललोय."
'निधी कमी पडू दिला जाणार नाही'
"ड्युटी कलेक्टरशी बोललोय; त्यांना म्हणलं, ६०० मीटरचा रस्ता आहे. आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये. माझ्या बहिणीला पण येता कामा नये आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता कामा नये. आता तो रस्ता झालाच पाहिजे. त्या कामाला यंत्रणेला लावलेलं आहे आणि निधी कमी पडू दिला जाणार नाही", अशी माहिती अजित पवारांनी दिली.
अजित पवार आधी काय म्हणाले होते?
सुप्रिया सुळेंच्या उपोषणाबद्दल यापूर्वी जेव्हा अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले होते की, "हा रस्ता अवघा ६०० मीटरचा आहे. रस्ता व्हावा ही इच्छा असेलच तर तो खासदार निधीतूनही करता येऊ शकतो."
त्याच्या या भूमिकेवर खासदार सुप्रिया सुळेंनीही टीका केली होती. "या देशातील सर्वच खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी आहे की, आमचे मतदारसंघ २३ लाख लोकांचे आहेत. माझ्या मतदारसंघात नऊ तालुके आणि २३ लाख मतदार आहेत. त्यासाठी ५ कोटींचा निधी खासदारांना मिळतो, तो कशासाठीच पुरत नाही. शाळांना, रस्त्यांना पैसे पुरत नाही. त्यामुळे आम्ही पंतप्रधान मोदींकडे मागणी केली आहे की, आमचा खासदार निधी वाढवावा."