इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पाच तासांपर्यंत आणण्याचे खरे श्रेय कोणाचे आहे, हे जनतेला माहिती आहे. वरिष्ठ नेत्यांसह माझ्या खांद्याला खांदा लावून मुख्यमंत्र्यांना त्या निर्णयापर्यंत आणणाऱ्या पाणलोट क्षेत्रातील आमदारांना आहे, असा दावा पत्रकारांशी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला.भरणे म्हणाले, ‘‘निर्णय झाल्यानंतर छायाचित्र काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे येणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी त्याचे फुकटचे श्रेय घेऊ नये. उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजकपात झाल्यानंतर, प्रथमत: शरद पवार मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आदींशी बोलले. वीजकपात रोखावी, अशी सूचना त्यांनी केली. विरोधी पक्षनेते आमदार अजित पवार दोनदा आमदारांसमवेत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले. आमदार राहुल कुल, आमदार बबन शिंदे, आमदार नारायण आबा पाटील, आमदार संग्राम थोपटे यांनी वीजकपात रद्द व्हावी, यासाठी अखेरपर्यंत पाठपुरावा केला. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी या प्रश्नावर अक्षरश: मध्यरात्री एक वाजता आमची व मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली. वीजकपात शिथिल करण्याचा निर्णय घेण्याआधी त्यांनी स्वीय सहायकाकरवी आम्हाला बोलावून घेतले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व या प्रश्नावर लढणाऱ्या सर्व आमदारांसमवेत प्रसिद्धी माध्यमांसमोर निर्णय जाहीर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी आपणास दिली.मुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासनवीजपुरवठा पाच तास करण्याचा निर्णय घेण्याआधी परिस्थिती बघून आठ तास वीजपुरवठा करण्याबाबत विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, दशरथ माने यांची आठ तासांच्या वीजपुरवठ्याची मागणी कायम होती. त्यामुळे आपण त्यासंदर्भात काही बोललो नाही, असेही आमदार भरणे यांनी या वेळी स्पष्ट केले.
वीजपुरवठ्याचे फुकटचे श्रेय कोणीही घेऊ नये
By admin | Published: April 16, 2016 3:47 AM