बारामती : जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी गृहखात्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याने शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपद दिले आहे. हा एक अपघात असल्याचे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी राेखठोक या सदरात केले होते. त्या पार्श्वभूमीवर बारामती येथे रविवारी माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता, महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशा स्पष्ट शब्दांत अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.
बारामतीत कोरोंना आढावा बैठकीनंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. पवार पुढे म्हणाले, दीपाली चव्हाण यांची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी घटना आहे. प्रत्येक ठिकाणी काम करताना आपल्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवूनच काम करायला हवे. या प्रकरणात पोलीस योग्य तो तपास करून यातील तथ्य शोधून काढतील. यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर सरकार कडक कारवाई करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नागरिकांनी शिस्तीचे पालन करायला हवे, सरकार वारंवार सूचना देत आहे, मात्र तरीही नागरिकांचा योग्य प्रतिसाद मिळत नाही. मास्कचा वापर अजूनही लोक करताना दिसत नाही. येत्या २ एप्रिलपर्यंत जर रुग्णसंख्या कमी झाली नाही, तर राज्याच्या प्रमुखांना नाईलाजाने काही कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. शासनाने जे निर्बंध घालून दिलेले आहेत, त्यांचे पालन प्रशासन स्तरावर कडकपणे करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.