---
नीरा : नीर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली दोन दिवस १०० लसी येऊनही कोणालाही लसीकरण करता आले नाही. पहिल्या डोसनंतर ८४ दिवस झालेल्यांपैकी एकाही जेष्ठ नागरिक या दोन दिवसांत लसीकरणासाठी फिरकलाच नाही. मागील आठवड्यापर्यंत नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ५ हजार १३० लसीकरणाचे डोस दिल्याची माहिती आरोग्य सहायक बेबी तांबे यांनी दिली.
राज्यभरात कोरोना लसीकरणाच गोंधळ निर्माण झाला असून हाच गोंधळ ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे. मागील आठवड्यात लसीकरणासाठी ज्येष्ठांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. आता मात्र लसीकरणाच्या दुसऱ्या डोसकरिता कोणीच फिरकेना, अशी अवस्था झाली आहे. तर १८ ते ४० या वयोगटातील लोकही पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली सहा दिवसांपासून कोरोना प्रतिबंधित लसीच तुटवडा झाल्याने लसीकरणाचा पहिला डोस नागरिकांना मिळू शकला नाही. ४५ ते ६० वय वर्ष वयोगटातील नागरिक कोरोना प्रतिबंधित लसीचा पहिला डोस मिळवण्यासाठी लसीच्या प्रतीक्षेत आहेत. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी लसीचा दुसऱ्या डोस करीत १०० लस उपलब्ध होऊनही नागरिक फिरकलेच नाहीत. नीरा आरोग्य केंद्रात बुधवारी लसीचा दुसरा डोस १२ ते १३ आठवड्या दरम्यान घ्यावा, असा नवा आदेश काढल्याने ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधित लसीचा पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी घेतला आहे, अशाच व्यक्तींना दुसरा डोस देण्यात येणार होता. अशी कोणतीही व्यक्ती नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात फिरकलीच नसल्याने लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय म्हवाण यांनी दिली.
--
चौकट
-
नवा नियम समजून सांगणे ठरते डोकेदुखी
लसीकरणाचा पहिला डोस देण्यासाठी खेडेगावातील ज्येष्ठांना रुग्णवाहिकेतून नीरेत आणून लसीकरण करून घेतले. या लोकांनी लस घेऊन आता ४५ ते ५० दिवस झाले आहेत. हे लोक जुन्या नियमानुसार ४२ दिवसांंनी लसीकरणासाठी येत आहेत. मात्र आता नवा नियम ८४ दिवसांचा आहे. हे त्या ज्येष्ठांना समजावून सांगताना आरोग्य कर्मचाऱ्यांना मात्र कामापेक्षा समुदेशन करणे डोकेदुखी ठरत आहे.