राजगुरुनगर : खेड तालुक्यासाठी राजगुरुनगर येथे सुरू केलेल्या नोंदणी कार्यालयाला संगणकाची ‘आॅनलाईन’ सुविधा नसल्याने हे कार्यालय म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असे झालेले आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे खेड तालुक्यात मालमत्तेचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले. इ.स. २००४ ते २००९ पर्यंत जर मालमत्तांच्या व्यवहारांना सोन्याचे दिवस होते. त्या वेळी राजगुरुनगरला असलेल्या एकमेव नोंदणी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत दस्तनोंदणीचे काम केले जाई. येथे दुय्यम निबंधक म्हणून बदली मिळावी, यासाठी मोठी स्पर्धा असे. त्यामुळे तालुक्यात दुसरे दुय्यम निबंधक कार्यालय, असावे अशी मागणी होऊ लागली. ती पूर्ण होऊन चाकणला २००८मध्ये दुसरे कार्यालय सुरू झाले आणि कामाची काहीशी विभागणी झाली. जागतिक मंदीनंतर मालमत्तांचे व्यवहार काहीसे थंडावले होते. तरी पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर चाकण परिसर वेगाने वाढत होता. त्यामुळे व्यवहारांचा ओघ सुरूच राहिला. ही दोन्ही कार्यालये अपुरी पडू लागल्याने तिसरे कार्यालय असावे, असा विचार सुरू झाला. येथील बाजार समितीच्या इमारतीत ते सुरू झाले; पण या कार्यालयाला ‘आॅनलाईन’ सुविधा शासनाने अद्याप दिली नसल्याने तेथे व्यवहार करण्याकडे लोकांचा कल दिसत नाही. त्यामुळे ते बहुतेक वेळा ओस पडलेले असते. सध्या एकाच दुय्यम निबंधकांकडे राजगुरुनगरचे जुन्या आणि नव्या कार्यालयाचा कार्यभार आहे. हे दुय्यम निबंधक जुन्या कार्यालयातच बसतात. त्यामुळे नवीन कार्यालयात नगण्य काम होते. (वार्ताहर)
राजगुरुनगर नोंदणी कार्यालयात नाही आॅनलाईन सुविधा
By admin | Published: May 13, 2014 2:46 AM