पुणे : बसची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी सद्यस्थितीत पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) ला पार्किंगसाठी जागा मिळत नाही.रस्त्यावर कुठेही बस उभ्या केल्याने वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असून हा दंड चालकांच्या वेतनातून कपात करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. हा भुर्दंड माथी मारल्याने चालकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पुढील वर्षभरात पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नवीन बस दाखल होणार आहेत. तर सध्या मालकीच्या व भाडेतत्वावरील जवळपास २ हजार बस आहेत. पण या बस पार्किंग करण्यासाठी पीएमपीकडे आवश्यक जागा उपलब्ध नाही. आगार तसेच बसस्थानकालगतच्या मुख्य रस्त्यांवरच बस उभ्या कराव्या लागतात. या बसमुळे अनेकदा वाहतुक कोंडीही होते. डेंगळे पुलालगतच्या महापालिकेकडे जाणाऱ्या दोन्ही बाजुला बस उभ्या केल्या जातात. याठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. तसेच महापालिकेसमोरील स्थानकावरही बस उभ्या असतात. याठिकाणी अनेकदा बसची संख्या अधिक झाल्याने उभ्या करण्यासाठीही जागा राहत नाही. त्यामुळे या बस काहीवेळा मुख्य रस्त्यावरच लावल्या जातात. परिणामी वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते. स्वारगेट, न.ता.वाडी आगार यांसह अन्य काही आगार परिसरातही हीच स्थिती असते. वाहतुक कोंडी झाल्यास वाहतुक पोलिसांकडून बसला जॅमर लावला जातो. त्यातच आता नवीन बसची भर पडणार आहे. त्यामुळे हा प्रश्न आणखी बिकट होत जाणार आहे.प्रशासनाने वाहतुक पोलिसांकडून केली जाणारी दंडात्मक कारवाई चालकांच्या माथी मारण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी दंड केल्यास संबंधित बसचालकाच्या वेतनातून दंडाची रक्कम वसुल करण्यात येणार आहे. ही रक्कम सुमारे पाच हजार रुपयांपर्यंतही असू शकते. त्यामुळे चालकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. बस उभ्या करण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नाही. डेक्कन जिमखाना, पुलगेट, महापालिका, हडपसर गाडीतळ याठिकाणी बस पार्किंगसाठी काहीप्रमाणात जागा आहे. पण पालिकेजवळील इतर रस्ते तसेच अन्य भागात रस्त्यावरच बस उभ्या करणे भाग पडते. बसची संख्या अधिक असल्यास एका बसला समांतर दुसरी बस लावावी लागते. यामध्ये चालकांचा काहीच दोष नाही. जागा उपलब्ध करून दिल्यास चालक तिथे बस उभ्या करतील. त्यामुळे प्रशासनाने चालकांवरील कारवाईचा निर्णय मागे घ्यायला हवा, अशी अपेक्षा चालकांकडून व्यक्त केली जात आहे.
नो पार्किंगचा भुर्दंड चालकांच्या माथी : पीएमपी प्रशासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 7:38 PM
वाहतुक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असून हा दंड चालकांच्या वेतनातून कपात करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.
ठळक मुद्देपार्किंगला मिळेना जागा, पोलिसांची कारवाईभुर्दंड माथी मारल्याने चालकांमध्ये नाराजी निर्माण