पिंपरी : ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई करताना चारचाकीपेक्षा दुचाकी वाहनेच वाहतूक पोलिसांच्या ‘रडार’वर असल्याचे अद्यापही दिसून येत आहे. याबाबतचे वृत लोकमतने रविवारी (दि. ७)प्रसिद्ध केले होते. यानंतरही वाहतूक पोलिसांकडून चारचाकी वाहनांवरील कारवाईकडे दुर्लक्ष करून दुचाकींनाच ‘लक्ष्य’ केले जात आहे. ‘नो पार्किंग’मध्ये दुचाकी लावली, तर ती उचलून नेण्याची भीती असते; पण तिथेच चारचाकी लावली जाते. यावर प्रकाशझोत टाकणारे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. वाहनांवरील कारवाईत चारचाकीपेक्षा दुचाकीवर अधिक प्रमाणात कारवाई केली जाते. दुचाकी भराभर टेम्पोत भरल्या जातात. मात्र, त्याच वेळी ‘जॅमर’ असूनही मोटारींवर कारवाई करण्याची तत्परता वाहतूक पोलिसांकडून दाखविली जात नाही. दुचाकींसह चारचाकी वाहनांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. चारचाकी वाहनावर कारवाई केल्यास कार्यालयात जाऊन संबंधित चालकाच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यासह कायदेशीर बाबी तपासाव्या लागतात. यासह लावलेला जॅमर काढण्यासाठी पुन्हा पोलिसाला वाहनाकडे यावे लागते. हा त्रास पोलिसांना नकोसा वाटतो. याशिवाय एखाद्या बड्या व्यक्तीच्या वाहनावर कारवाई केल्यास लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन फिरविला जातो. त्यामुळेही कारवाई करताना टाळाटाळ होत आहे. चारचाकींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे ‘जॅमर’ आहेत. मात्र, ‘जॅमर’ लावण्याची तसदीही पोलिसांकडून घेतली जात नाही. त्यामुळेच चारचाकींपेक्षाही दुचाकींवरील कारवाईचे प्रमाण अधिक आहे. कारवाई करण्यासह वाहतुकीलाही सोपे असल्याने चारचाकींऐवजी दुचाकींवरच पोलिसांचा कारवाईचा ‘धडाका’सुरू असतो. (प्रतिनिधी)
नो-पार्किंगमधील मोटारींकडे दुर्लक्षच
By admin | Published: June 15, 2015 6:07 AM