लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जुने पोलीस ठाणे अन् आता प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे आलेले वाहन यामुळे शहरातील पोलीस ठाण्यांमधील अधिकारी आणि कर्मचा-यांनाच असलेली जागा वाहनांच्या पार्किंगसाठी पुरत नाही. त्यामुळे सर्रासपणे वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. शहरातील बंडगार्डन आणि खडक पोलीस ठाणी ही सर्वात जुनी पोलीस ठाणी येथे पोलिसांनाच पार्किंगसाठी जागा नाही. तर आलेल्यांना नागरिकांसह सर्वांना रस्त्यावर वाहने पार्क करावी लागत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.
फरासखाना इमारत ही तशीच शहरातील पोलिसांचे सर्वात जुने ठिकाण. या ठिकाणी फरासखाना, विश्रामबाग ही दोन पोलीस ठाणी, तसेच २ सहायक पोलीस आयुक्त, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त आणि अपर पोलीस आयुक्त यांची कार्यालये आहेत. शहराच्या सर्वात गजबलेल्या शिवाजी रोडला लागून असलेल्या या इमारतीबाहेर पार्किंगसाठी अनेक वर्षांपूर्वी जागा होती तेवढीच जागा आता आहे. त्यात या ठिकाणी वाहतूक शाखेचे एक कार्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांच्या वाहनांनाच पार्किंगसाठी जागा अपुरी पडते. त्यात शेजारीच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर व बाजारपेठेचा भाग असल्याने येथे भाविक व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे पार्किंग ही येथील सर्वात जटिल समस्या आहे.
गेल्या वर्षी पोलीस आयुक्तालयातील पार्किंगच्या जागेवर फरशी टाकण्याचे तसेच गुन्हे शाखेच्या इमारतीचे काम सुरू होते. त्यामुळे येथील सर्व वाहने बाहेर पार्क करावी लागत होती. तेव्हा पोलीस कर्मचारीच नो पार्किंगमध्ये वाहने लावत असल्याचे दिसून आल्यावर पोलिसांना कायदा नाही का, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळी वाहतूक शाखेने या ठिकाणी पोलिसांसह नो पार्किंग तसेच डबल पार्किंग केलेल्या सर्व वाहनांवर सातत्याने कारवाई केली होती.
शहरात अनेक पोलीस ठाण्याचे नूतनीकरण करण्यात आले आहेत. तसेच काही पोलीस ठाणी नव्याने बांधण्यात आली आहेत. त्या ठिकाणी पार्किंगची चांगली सोय करण्यात आली आहे.
बंडगार्डन पोलीस ठाणे
बंडगार्डन पोलीस ठाणे हे शहरातील सर्वात जुन्या पोलीस ठाण्यांपैकी एक पोलीस ठाणे़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे पोलीस ठाणे असले तरी येथे पार्किंगसाठी जागाच नाही.
खडक पोलीस ठाणे
शिवाजी रोडवरील मामलेदार कचेरीच्या शेजारीच खडक पोलीस ठाणे आहे. मामलेदार कचेरीच्या नूतनीकरणाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्या ठिकाणी या पोलीस ठाण्याला जागा मिळणार आहे. मात्र, आज तरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व येथे येणा-या नागरिकांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही.
.....
शहरातील नो पार्किंगची कारवाई
जानेवारी ते मे २०२० जानेवारी ते मे २०२१
एकूण केसेस १७४४२८ १००७५५
एकूण दंड ३४८८५६०० २०१५१२००