पुणे : भाजपच्या सोशल मीडिया च्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी अमित शहा पुण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिरात त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला आलेल्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व बाहेरील रस्त्यावर नो पार्किंग मध्ये आपल्या चारचाकी लावल्या होत्या. नेहमी तातडीने वाहनांवर कारवाई करणारे वाहतूक पोलीस आज मात्र बघ्याच्या भूमिकेत होते.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे अाज (रविवार) पुणे दाैऱ्यावर अाहेत. दुपारी त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अादी उपस्थित हाेते. दुपारी 2.30 च्या सुमारास पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा बांलगंधर्व रंगमंदिरात दाखल झाले. यावेळी राज्यभरातून अालेल्या साेशल मिडिया स्वयंसेवकांची गर्दी बालगंधर्व मध्ये झाली हाेती. यावेळी जंगली महाराज रस्त्यावरील नाे पार्किंगच्या जागेतही अनेक कार्यकर्त्यांनी अापल्या चारचाकी लावल्या हाेत्या. यावेळी वाहतूक पाेलीस हजर असूनही त्यांनी या वाहनांवर कुठलिही कारवाई केली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या वाहनांवर कारवाई करणारे वाहतूक पाेलिस अाज मात्र बघ्याच्या भूमिकेत हाेते.
दरम्यान बालगंधर्वमध्ये अमित शहांचा कार्यक्रम सुरु असताना सामान्य लाेकांना बालगंधर्व परिसरात जाण्यापासून मज्जाव करण्यात अाला हाेता. नाटकाची तिकिटे खरेदी करण्यासाठी अालेल्या रसिकांची यामुळे माेठी निराशा झाली. बालगंधर्वच्या कार्यक्रमानंतर अमित शहांची अापटे रस्त्यावरील हाॅटेल रेंदिव येथे पदाधिकाऱ्यांसाेबत बैठक हाेती. यावेळी माेठा पाेलीस बंदाेबस्त या ठिकाणी तैनात करण्यात अाला हाेता. चाैका-चाैकात पाेलीस उभे करण्यात अाले हाेते. तसेच संताेष बेकरीकडून हाॅटेलकडे जाणारा रस्ता पाेलीसांनी वाहतूकीसाठी बंद केला हाेता. त्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामाेरे जावे लागले.