महिला सुरक्षा समितीने पुणे शहरातील ५० असुरक्षित ठिकाणे शोधून त्याबाबतचा अहवाल दिला होता. मात्र, या अहवालाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याचे हनुमान टेकडीवर घडलेल्या विद्यार्थिनीवरील बलात्काराच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे शहरातील अशा प्रकारच्या महिला व मुलींसाठी असुरक्षित असलेल्या ठिकाणांवर पोलीस गस्तही घालत नाहीत, सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याचेही ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून स्पष्ट झाले आहे.टीम लोकमत, पुणेमहिला अत्याचाराची घटना घडल्यावर सर्व यंत्रणा जाग्या होतात, उपाययोजना ठरवितात; मात्र एकदा धुरळा खाली बसला, की त्याकडे दुर्लक्ष होते. निर्भया घटनेनंतर राज्य शासनाकडून पुण्यात महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापण्यात आलेल्या या समितीने महिलांसाठी शहरात असुरक्षित ५० ‘हॉट पॉइंट्स’ची यादी दिली. पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि महावितरण अशा सर्वच यंत्रणांनी विविध उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, विषय मागे पडला आणि ही ठिकाणे अजूनही ‘हॉट स्पॉट’च आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस ठाण्यांची स्थानिक पातळीवरची गस्त आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत नसल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे. या सार्वजनिक ठिकाणांवर पोलिसांचा हवा असणारा ‘वॉच’ न राहिल्यामुळे भुरट्यांकडून सर्वसामान्यांना लुटण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषत: शहरातील टेकड्यांवर अशा प्रकारच्या घटना वाढत चालल्या आहेत. महिला व मुलींच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांतील तब्बल ५० ठिकाणांची जंत्री या समितीने तयार केली होती. या ठिकाणांवर छेडछाडीचे घडणारे प्रकार, मुलींसोबत घडू शकणारे संभावित गैरप्रकार यांचा अभ्यास करून ही यादी तयार करण्यात आली होती. पोलिसांच्या दृष्टीने यातील ‘हॉट पॉइंट्स’वर विशेष लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी गस्त वाढविणे, गर्दीच्या वेळी, सकाळी आणि संध्याकाळी पोलिसांचा या भागात वावर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही दिवस चाललेले पोलिसांचे हे सोपस्कार नंतर बंद पडले. जाता-येता कधी तरी एखादी चक्कर मारली म्हणजे झाले, अशी भूमिका सध्या पोलिसांनी घेतल्याचे चित्र आहे. बागेत, टेकड्यांवर अंधारात बसणे, निर्जन स्थळी जाणे जोडप्यांसाठी धोकादायक असून, कोणताही गैरप्रकार घडण्याची शक्यता असते. अशा ठिकाणांवर पोलिसांनी गस्त घालणे, त्यांना हटकणे आवश्यक आहे. ज्या रस्त्यांवर कमी प्रकाश आहे, तेथील प्रकाशव्यवस्था वाढवणे, पदपथ सुरक्षित करून घेणे, भुयारी मार्गांमध्ये पुरेशी प्रकाशव्यवस्था करणे. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दारे-खिडक्या व्यवस्थित असणे, प्रकाशव्यवस्था चोख असणे अशी कामे मुख्यत्वे करून महापालिका, महावितरण आणि पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून एकत्रितपणे या समितीमार्फत करण्यात येणार होते. सध्या तरी समितीने सुचवलेल्या उपाययोजनांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.महिलांची छेडछाड, रोडरोमिओंचा सहन करावा लागणारा त्रास, पाठलाग, एकतर्फी प्रेम अशा अनेक समस्यांचा सामना कसा करायचा, पोलिसांची मदत कशी घ्यायची, यासोबतच स्वसंरक्षण याबाबत शाळा-महाविद्यालये आणि खासगी क्लासमधील मुलींशी संवाद साधायला पोलिसांनी सुरुवात केली होती. मात्र, हा संवाद काही दिवसच चालला. शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, बागा, गल्लीबोळ, बाजार, क्लास, बसथांबे, धार्मिक स्थळे, महत्त्वाचे रस्ते आणि खाऊगल्ल्या आदी ठिकाणांची पाहणी केल्यानंतर समितीने काही निष्कर्ष काढून ही यादी संबंधित परिमंडलांच्या उपायुक्तांकडे सोपविली होती. तसेच, यापूर्वी महिलांची छेडछाड अथवा गैरप्रकार घडलेल्या ठिकाणांचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता. महिला सुरक्षा समितीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसोबतच महापालिकेच्या अधिकारी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे. या समितीची दर महिन्याला बैठक होते. या बैठकांमध्ये महिला सुरक्षेचा नेमका कोणता आढावा घेतला जातो, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.चतु:शृंगी टेकडीवर अंधारातही एकट्या महिलांचा वावरचतु:शृंगी टेकडीवर जॉगिंंगसाठी, निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या टेकडीवर सायंकाळी ७ वाजता अंधार पडल्यावर पाहणी करायला ‘लोकमत’ची टीम गेली होती. या पाहणीत रात्रीच्या वेळी महिला एकट्या फिरत असल्याचे दिसून आले.ही टेकडी दिवस-रात्र ये-जा करण्यासाठी उघडी आहे. तेथे रात्री उशिरा जातानाही कोणी हटकत नसल्याचे चित्र आहे. सातच्या सुमारास अंधार पडलेला असतानाही एकट्या महिला, विद्यार्थिनी या टेकडीवर फिरत असल्याचे दिसून येत होते.या टेकडीवर प्रकाशाची कोणतीही सोय नाही. तेथे सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसविण्यात आले आहेत मात्र ते चालू नसल्याचे दिसून आले. या टेकडीवर सुरक्षेच्या दृष्टिने कोणतीही सोय नसल्याचे चित्र होते. रात्री तरूण-तरूणींचे जोडपे एकटे फिरत असल्याचे दिसून आले. या सर्वांना सुरक्षेबाबत काहीच गांभिर्य नसल्याचे दिसून आले.५० ठिकाणांची यादीमहिला आणि मुलींच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांतील तब्बल ५० ठिकाणांची जंत्री या समितीने तयार केली होती. या ठिकाणांवर छेडछाडीचे घडणारे प्रकार, मुलींसोबत घडू शकणारे संभावित गैरप्रकार यांचा अभ्यास करून ही यादी तयार करण्यात आली होती. सुरक्षारक्षकच नाहीतबलात्काराची घटना ज्या हनुमान टेकडीवर घडली, त्या टेकडीवर शुक्रवारी ‘लोकमत’ टीमने गस्त घातली असता एकही पोलीस, वन विभागाचा सुरक्षारक्षक दिसून आला नाही. टेकडीवर मुलांचे टोळके सर्रास फिरत होते. त्याचबरोबर, दारू प्यायलेले झोपडपट्टीतील काही पुरुषही टेकडीवर फिरत असल्याचे दिसून आले. फिरायला जाताना काळजी घ्या..कोणत्याही निर्जन ठिकाणी फिरण्या किंवा बसण्यापूर्वी प्रत्येकाने स्वत:च काळजी घेण्याची गरज आहे. निर्जन ठिकाण असतानाही तेथे बसणे किंवा फिरायला जाणे धोक्याचे आहे, हे आपण ओळखायला हवे. वर्दळ कमी होत आहे, अंधार पडत आहे अशा परिस्थितीत आपण त्या ठिकाणी फिरावे का, याबाबत स्वत:लाच प्रश्न विचारण्याची गरज आहे. अशा ठिकाणी चोरीपासून बलात्कारापर्यंत कोणताही प्रसंग ओढवू शकतो. रिस्क घेताना आपण स्वत:लाच धोक्यात घालत आहोत का, याची शहानिशा करण्याची गरज आहे. त्यामुळे विविध अॅप व तंत्रज्ञानाचा वापर करून काळजी घेतली पाहिजे.
असुरक्षित ‘हॉट पॉइंट्स’वर नाही गस्त
By admin | Published: February 27, 2016 4:42 AM