लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेच्या चिखली येथील शाळेची जागा पोलीस ठाण्यासाठी देऊ नये, अशी मागणी नगरसेवक दत्ता साने यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात दत्ता साने यांनी म्हटले आहे की, चिखली येथे महापालिकेची शाळा आहे. या शाळेत सध्या १६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुलांना बसण्यास जागा नसल्यामुळे दोन सत्रात शाळा भरविण्यात येत आहे.महापालिकेने या शाळेची जागा पोलीस ठाण्यासाठी दिली आहे. पोलीस ठाण्यासाठी शाळेची इमारत देताना या विद्यार्थ्यांच्या बसण्याची पर्यायी व्यवस्था कोठे करणार ? याबाबत महापालिकेने गांभीर्याने विचार केलेला नाही. शाळेसाठी सध्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. परंतु, ते काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शाळेची जागा पोलीस ठाण्याला देऊ नये, अशी भूमिका साने यांनी मांडली आहे.विद्यार्थ्यांना त्वरित नवीन शाळेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा महापालिकेच्या मुख्य इमारतीत विद्यार्थ्यांना बसवून शाळा भरविण्यात येईल, असा इशाराही साने यांनी दिला आहे. शाळेच्या तीन वर्गखोल्या पोलीस ठाण्यासाठी देण्यात आल्या आहेत.
शाळा इमारतीत पोलीस ठाणे नको
By admin | Published: May 29, 2017 2:34 AM