- प्रकाश कोकरे पुणे : शासनाने बाणेर-बालेवाडी, औंध, पाषाण परिसराला स्मार्ट सिटी असे घोषित केले असले, तरी या भागात अत्यावश्यक पोलीस ठाणे नाही. जर नागरिकांना फिर्याद द्यायची असेल, तर चतु:शृंगी पोलीस ठाण्याला पाच ते सात किलोमीटर अंतर पार करून जावे लागते. त्यामुळे स्मार्ट सिटीची कायदा सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे. जवळ पोलीस ठाणे नसल्यामुळे गुन्हा घडल्याच्या ठिकाणी पोलिसांना पोहोचण्यासाठी देखील वेळ लागतो.या भागातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. स्मार्ट सिटीचा परिसर हा २५ ते ३० किलोमीटरचा आहे. या मोठ्या भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची अत्यंत गरज आहे. स्मार्ट सिटी लोकसंख्येत वेगाने वाढ होत आहे.सध्या या भागाची लोकसंख्या अंदाजे दीड लाखाच्या घरात आहे. चतु:शृंगी पोलीस चौकीवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.या भागात अनेक आयटी कंपन्या; तसेच बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे या भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. त्यामुळे या गावठाणांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून गेला आहे. जमीन खरेदी-विक्रीमधून मोठ्या प्रमाणात या भागात पैसा आल्यामुळे अनेक गुन्हेगारी कृत्ये होत आहेत. पोलिसांची ज्या प्रकारची भीती असावी त्याप्रकारची दिसून येत नाही, त्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांचा वचक राहिला नाही. या परिसरासाठी चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून काम पाहिले जाते.पोलीस ठाण्याची इमारत प्रतीक्षेतपरंतु, बाणेर-बालेवाडीसाठी कमिन्स कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या आवारात पोलीस चौकी बांधून देण्यात आली आहे. कंपनीने ही वास्तू पोलीस प्रशासनाला सुपूर्द करण्यात आली आहे; परंतु दोन वर्षांपासून ही चौकी चालू करण्यात आली नसून, कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांची नोंदसुद्धा या ठिकाणी करून घेतली जात नाही. त्यामुळे या परिसरामध्ये जबरी चोरी, फसवणूक, सोनसाखळीचोरी, वाहनचोरी, दंगा, घरफोडी अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिसरात संध्याकाळी पोलिसांमार्फत घातल्या जाणाºया गस्तीचे प्रमाण कमी आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता, मनुष्यबळ कमी आहे किंवा शासनाची परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बाणेर-बालेवाडीच्या नागरिकांकडे प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. चतु:शृंगी पोलीस स्टेशनपासून बाणेर-बालेवाडी हे अंतर जास्त आहे, तसेच अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे गुन्हेगार पसार होत आहेत. स्वतंत्र पोलीस ठाणे पुरवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.गस्ती पथकांची संख्या तीन आहे. १ बीट मार्शल आहे. परिसरात मदतकेंद्र सुरू केले आहे. स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी शासनाची मंजुरी मिळालेली नाही. आॅनलाइन गुन्ह्यांच्या नोंदी जरी होत असल्या, तरी प्रत्यक्षात तक्रारदाराला चतु:शृंगी पोलीस ठाण्याला यावे लागते.- दयानंद ढोमे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:शृंगी
स्मार्ट सिटीला नाही पोलीस ठाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 2:30 AM