पुणे : ‘राजकारणात जे घडते तेच राजकारण नाट्य परिषदेमध्येही पाहायला मिळाले; परंतु, जेव्हा नाट्य परिषदेच्या कामासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतात, अगदी तसेच नाट्य परिषदेमध्येदेखील कार्य व्हायला हवे. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा अर्ज भरावा लागणे, हा ज्येष्ठ कलावंतांचा अपमान आहे. ज्येष्ठांना अध्यक्षपदासाठी झुंजावे लागते, हेदेखील योग्य नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक न होता ते बिनविरोध निवडावे,’ अशी अपेक्षा उद्योगमंत्री आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ कलावंतांचा झाला यथोचित गौरव -शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन शुकवारी सामंत यांच्या हस्ते झाले. या वेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, मराठी नाट्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, शंभराव्या नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल, दत्ता भगत, सुरेश खरे, शशी प्रभू, अभिनेते मोहन जोशी, अशोक खांडे, खासदार श्रीनिवास पाटील, विजय चौगुले आदी उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ कलावंत स्वरूप कुमार, लीला गांधी, सुहासिनी देशपांडे यांचा सन्मान झाला. त्यानंतर गंगाधर गवाणकर यांचाही गौरव झाला.
कलाकारांसाठी वृद्धाश्रमविक्रम गोखले यांनी परिषदेला पाच कोटींचा भूखंड दिला आहे. त्यांची इच्छा होती की, वृद्ध कलावंतांना फायदा व्हावा. कलावंतांसाठी वृद्धाश्रमासाठी ती जागा दिली आहे. त्याबाबत बोलताना रत्नागिरीला होणाऱ्या संमेलनाच्या अगोदर या वृद्धाश्रमाचे भूमिपूजन करू, असे आश्वासन सामंत यांनी दिले.
दोन्ही पवारांची दांडीज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाेघेही नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला आले नाहीत. त्यामुळे पवार एका मंचावर येणार असल्याची चर्चा हवेतच विरली.