लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: बलात्कारासारख्या घटना सातत्याने घडत असताना यात राजकारण नको, ही सरकारची भूमिका पळ काढणारी आहे. व्यवस्था म्हणजे सरकारच असते व अंतिम जबाबदारी सरकारचीच आहे, अशी टीका आम आदमी पार्टीने (आप) केली आहे.
या प्रकारच्या घटनांमध्ये त्या होऊ नयेत म्हणून प्रभावी उपाययोजना करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे असे स्पष्ट करून आपचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले की, दिल्लीत आपच्या राज्य सरकारने हे करून दाखवले आहे. महिलांना सुरक्षेसाठी रस्त्यावर दिवाबत्ती, महिलांना असुरक्षित वाटते अशा जागी सीसीटीव्ही कॅमेरे, बसमध्ये महिला मार्शल, महिलांना मोफत बस प्रवास अशा अनेक उपायांचा त्यात समावेश आहे व त्याचा चांगला परिणामही दिसून येत आहे.
या गोष्टी करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकार, यात राजकारण नको असा शहाणपणा विरोधकांना सुचवत आहे अशी टीका करून किर्दत यांनी त्यापेक्षा काय करणार आहात या स्थितीवर हे पुढे येऊन जनतेला सांगा असे आवाहन केले. सार्वजनिक सेवा देणाऱ्या क्षेत्रातील व्यक्ती असे गुन्हे करण्यास धजावतात ही बाब सर्वसामान्य पालक आणि महिला, मुलींना असुरक्षित करणारी आहे. हे लक्षात घेऊन सरकारने धाडसाने याविरोधात पावले उचलावीत अशी आपची मागणी आहे, असे किर्दत यांनी सांगितले.