इंदापूर : इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, कार्यक्रम पत्रिकेत नाव नाही म्हणून नावावरून गदारोळ चालू असल्याची गुप्त खबर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पर्यंत पोहोचली. त्यावरून पवार यांनी याचे नाव नाही, त्याचे नाव नाही, हे काय चाललंय, नावाला काय करायचे आहे. मानापानाचे राजकारण न करता कामाला प्रथम प्राधान्य द्या, अशा शब्दांत कार्यकर्त्यांना फटकारले.इंदापूर बाजार समिती आयोजित शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते. पवार पुढे बोलताना म्हणाले की, सध्या तरुण मुलांमध्ये मोबाईलचे दुष्परिणाम जाणवत आहेत. तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोबाईलमध्ये पाहताना दिसले. तो धागा पकडून पवार यांनी जिल्हाध्यक्षांकडे मोर्चा वळविला. ते म्हणाले की, ते पाहा..! आता जिल्हाध्यक्षच मोबाईलमध्ये पाहतोय. पक्षाचे कसे होणार..! अरे आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण परंपरागत त्यांना चहापाणी विचारावे, त्या मोबाईलमध्ये काय बोटे घालताय. तालुक्यात पण लक्ष द्या. कारण राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मला वेळोवेळी इंजेक्शन द्यायला लावू नका. असाही दम कार्यकर्त्यांना भरला. कृषी प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका पाहून अजित पवार थक्क झाले. कारण त्यामध्ये एक हजार निमंत्रित मान्यवरांची नाव होती. त्याबाबतदेखील पवार यांनी आतापर्यंत मी देशात अशी कार्यक्रम पत्रिका पाहिली नसल्याचे सांगत निमंत्रण पत्रिकेचे कौतूक केले.घोडे बाजाराचे नुकतेच उद्घाटन केल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना देखील फटकारले. घोडे बाजार चांगला आहे. मात्र, राजकीय घोडे बाजार भरवू नका. एकमेकाला मानसन्मान द्या. तीच आपल्या पक्षाची परंपरा असल्याचे सांगायला पवार विसरले नाहीत. खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, सभापती प्रवीण माने यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासात्मक नियोजनामुळे सभापती अप्पासाहेब जगदाळे व संचालक मंडळाचे कौतुक केले.
मानापानाचे राजकारण नको; कामाला प्रथम प्राधान्य द्या- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 2:15 AM