पुण्यातील पराभवाची काँग्रेसकडून ना खंत ना खेद; कारणमीमांसा व्हायला हवी, कार्यकर्त्यांचे म्हणणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 12:04 PM2024-06-20T12:04:28+5:302024-06-20T12:05:19+5:30
काँग्रेसला धंगेकरांच्या हक्काच्या कसबा विधानसभा मतदारसंघातही पिछाडी पाहावी लागल्याने पराभवाची कारणमीमांसा व्हावी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे
राजू इनामदार
पुणे : राज्यातच नव्हे, तर देशातही काँग्रेसने अनेक लोकसभा मतदारसंघात बाजी मारली. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात मात्र काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. राज्यात अन्य ज्या ठिकाणी पराभव झाला तिथे त्याची दखल घेत प्रदेश काँग्रेसने दुरुस्तीही केली. पुणे लोकसभा मतदारसंघात मात्र पक्षाकडून अधिकृत स्तरावर पराभवाची साधी कारणमीमांसाही व्हायला तयार नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच आता याची जोरदार कुजबुज सुरू झाली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघ स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ होता. मात्र, गेल्या तीन सलग लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आणि या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले. तीनही वेळा वेगवेगळे उमेदवार होते, तरीही तब्बल तीन साडेतीन लाखांच्या फरकाने हे उमेदवार विजयी झाले. २०२४ च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा वेगळा उमेदवार दिला. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत २८ वर्षांचा हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणणारे रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली.
दोन माजी नगरसेवकांमध्ये ही लढत झाली. धंगेकर यांच्या मागे कसब्याचे वलय होते. म्हणून ही लढत चुरशीची होईल अशी राजकीय निरीक्षकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र भाजपने सव्वा लाख मतांच्या फरकाने विजय मिळविला. काँग्रेसला धंगेकर यांच्या हक्काच्या कसबा विधानसभा मतदारसंघातही पिछाडी पाहावी लागली. त्यामुळेच या पराभवाची कारणमीमांसा व्हावी, त्यात अनेक गोष्टी उघड होतील, असे काँग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
नेत्यांच्या कामाबाबत कार्यकर्त्यांच्या अनेक तक्रारी
पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी अंग झ़टकून काम केले नाही असे कार्यकर्त्यांना वाटते. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसबरोबर लहान मोठ्या तब्बल ३८ संघटना व त्याशिवाय प्रमुख घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उद्धव ठाकरे) हे पक्ष होते. विजयी उमेदवाराला मिळणारे मताधिक्य घटले आहे ही काँग्रेससाठी दिलाशाची बाब असली तरी त्यामुळेच आणखी जोर लावला असता तर काँग्रेसला विजयही मिळाला असता, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. अनेक स्थानिक नेत्यांनी संपूर्ण निवडणूक काळात काँग्रेसभवन सोडलेच नाही, मित्र पक्षांना विश्वासात घेतलेच गेले नाही, नियोजनासाठीच्या समित्या परस्पर केल्या गेल्या अशा अनेक तक्रारी केल्या जात आहेत.
पक्षविराेधी कारवाईबाबत पुण्यातच ‘क्लीन चिट’ का?
मात्र, पक्षाकडूनच या पराभवाची मीमांसा केली जात नाही असे कार्यकर्त्यांचे मत आहे. प्रदेश समितीकडून राज्यातील अन्य मतदारसंघांमध्ये जिथे पराभव झाला तिथे अशी मीमांसा केली गेली. कामचुकारपणा केला असे आढळल्यावर कारवाईही करण्यात आली. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला. असे काहीच पुणे लोकसभा मतदारसंघात होत नसल्याने पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.
प्रदेशाध्यक्षांनी विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाल्यावर पुणे शहरासाठी वेळ देणार असे सांगितले आहे. त्यावेळी या पराभवाची कारणे शहर शाखेकडून देण्यात येतील. सविस्तर आढावा त्या बैठकीत घेऊ.- अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस
विधानसभा मतदारसंघनिहाय अहवाल तयार करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्षांनीच तशी सूचना केली आहे. अहवालासाठी माहिती घेण्यात येत आहे. हा अहवाल समोर ठेवून कारणमीमांसा करण्यात येईल.- मोहन जोशी- प्रचार प्रमुख, काँग्रेस
पराभवाची कारणे शोधण्यात मला स्वत:ला रस नाही. मी काम करणारा माणूस आहे, मात्र पक्ष म्हणून याचा शोध वरिष्ठ घेतीलच. पराभव झाला तरीही आम्ही लगेच कामाला लागलो आहोत. सुरक्षित पुणे यावर आम्ही ठाम आहोत.- रवींद्र धंगेकर, काँग्रेस उमेदवार