पुणे : शहरात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये बाधित झालेली कुटुंब प्रकल्पग्रस्त नाहीत. त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करता येत नसल्याचे पत्र आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहे. पालिकेच्या मुख्य सभेने पर्वती येथील सर्व्हे क्रमांक १३५ येथील फायनल प्लॉट क्र. २८ मधील पुरात बाधित झालेल्या २६ कुटुंबांचे आठ दिवसात जवळच्या परिसरात पुनर्वसन करण्याचा ठराव केला होता. परंतू, आयुक्तांच्या पत्रामुळे पुनर्वसन रखडण्याची चिन्हे आहेत. शहरात अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या पुरात हजारो कुटुंब बाधित झाली. सोसायट्या, झोपडपट्ट्यांसह ओढ्याशेजारील उद्याने, वास्तूंना या पुराचा तडाखा बसला. साधारणपणे २८ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी या पुरात गेला. पर्वतीमधील सर्व्हे क्रमांक १३५ फायनल प्लॉट क्रमांक २८ येथील २६ कुटुंबांचेही पुरामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुरात बाधित झालेल्या या २६ कुटुंबांना आठ दिवसात एक किलोमीटरच्या आत उपलब्ध सदनिकांमध्ये पुनर्वसित करण्याचा ठराव करण्यात आला. पालिकेच्या गाळा वाटप नियमावलीमध्ये आपतकालीन परिस्थतीमध्ये बाधित झालेल्या कुटूंबांना सध्या समाविष्ट करण्यास तसेच राज्यसरकारची मान्यता मिळेल या भरवश्यावर आठ दिवसात पुर्नवसन करण्यास मान्यता देण्यात येत आहे असा ठराव स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने केला होता. यासंदर्भात शहर सुधारणा समिती तसेच स्थायी समिती मार्फत आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्वसाधारण सभेला एक पत्र पाठविले आहे. पुरामध्ये बाधित झालेली कुटुंब ही प्रकल्पग्रस्त नाहीत. त्यामुळे त्यांचे पुर्नवसन करता येणार नाही असे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुनर्वसनाची आस लावून बसलेल्या बाधितांच्या आशांवर पाणी फेरले गेल्याची टीका होत आहे.
पुणे शहरातील ' त्या ' पुरग्रस्तांचे पुनर्वसन पालिकेला अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 7:54 PM
शहरात अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या पुरात हजारो कुटुंब बाधित झाली.
ठळक मुद्देआपतकालीन परिस्थितीत बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करता येत नसल्याचे आयुक्तांचे पत्र