Pune Lockdown पुण्याला दिलासा नाहीच! विकेंड लॉकडाऊन सुरूच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 11:52 AM2021-06-19T11:52:17+5:302021-06-19T12:50:48+5:30
ग्रामीण भागात देखील बंधने शिथिल नाहीतच
पुणे शहरात आणि ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी होऊन देखील शहराला कोणताही दिलासा मिळालेला नाहीये. पुणे शहरात विकेंड लॉकडाऊन आहे तसाच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपस्थिती आज कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहर तसेच ग्रामीण भागात संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरात विकेंड लॉकडाऊन रद्द होईल तर ग्रामीण भागात अत्यावश्यक वगळता इतर सेवा सुरु होतील अशी अपेक्षा होती.
पण आज कोणताही दिलासा देण्यात आला नाही. सर्व बंधनं आहेत तशीच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबरोबरच गर्दी होणाऱ्या सर्व ठिकाणी चाचण्या वाढण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. आता नवीन नियमानुसार दुकानदारांची तसेच कर्मचाऱ्यांची दर पंधरा दिवसांनी चाचणी करण्यात येणार आहे.
याविषयी माहिती देताना गिरीश बापट म्हणाले ," नेहमीप्रमाणे आजही बैठक झाली. गेल्या आठवड्यात जी नियमावली होती तीच कायम राहील. कोरोनाचं प्रमाण कमी झालं असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेउन शनिवार रविवारचा लॅाकडाउन कायम राहील.
तिसऱ्या लाटेसाठी तयारी देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी रुग्णालये अपग्रेड करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे असे बापट यांनी सांगितले.