लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनाला कोरोना महामारीचा फटका बसल्याचे दिसत आहे. लोकांकडे पैसे नसल्याने या योजनेला मिळणारा प्रतिसाद घटला आहे. निम्म्यापेक्षा अधिक लोक सदनिकांची दहा टक्के रक्कमही भरु शकलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या निकषानुसार सदनिका वाटप करण्याचे ठरविले आहे.
केंद्र शासनाच्या ‘परवडणारी घरे’ या योजनेंतर्गत शहरात पंतप्रधान आवास योजना राबविली. खराडी, हडपसर व वडगाव याठिकाणी २ हजार ९१८ घरांचे पाच प्रकल्प उभारण्यात आले. या घरांसाठी २० हजार नागरिकांनी नोंदणी केली. पालिकेने २४ ऑक्टोबर २०२० रोजी घरांची ऑनलाईन सोडत काढली. पात्र ठरलेल्यांसह लाभार्थ्यांची प्रतिक्षायादी संकेतस्थळावर टाकण्यात आली. सोडतीमध्ये नाव आलेल्या नागरिकांना बारा लाख रुपयांमध्ये घर दिले जाणार आहे. त्यासाठी सदनिकेच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम प्रशासनाकडे भरावी लागणार आहे.
पालिकेने दिलेला ३० दिवसांचा अवधी संपल्यानंतरही या कालावधीत अवघ्या १ हजार २०० नागरिकांनीच पैसे भरले आहेत. प्रतिक्षा यादीमधीलही नागरिक पैसे भरु शकलेले नाहीत. नावे नोंदविलेल्यांमध्ये झोपडपट्टीत राहणारे, आर्थिक दुर्बल अशांचीच संख्या अधिक आहे. त्यांचेही उत्पन्नाचे मार्ग बंद झालेले आहेत. सद्यस्थितीत भूक भागविण्याचे आव्हान समोर असताना सदनिकेसाठी पैसे भरणे शक्य नसल्याचे अनेकांनी सांगितले.
बँक कर्जाची सुविधा उपलब्ध असली तरी आवश्यक उत्पन्नाची शाश्वती आणि कागदपत्रे नसल्यानेही अडचणी आहेत. त्यामुळे पालिकेने आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या निकषाने सदनिका देण्याचा निर्णय घेतला असून आरक्षणाच्या प्राधान्यक्रमानुसार सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे.