पुणे : गेल्या काही दिवसांपासून ती समाज कल्याण कार्यालयात हेलपाटे मारत होती़. पण काही केल्या काम होत नव्हते. त्या नैराश्यातून चंद्रपूरच्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले़. तासाभराच्या प्रयत्नानंतर या महिलेला खाली घेण्यात पोलीस अग्निशामक दलाला यश आले आहे़.
सोनूबाई येवले (वय४५, रा़ चंद्रपूर) असे या महिलेचे नाव आहे़. समाज कल्याण कार्यालयात या महिलेचे काम आहे़. गेल्या काही दिवसांपासून ती या कार्यालयात हेलपाटे मारत होती़. पण काम होत नसल्याने निराश झालेल्या या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेल्या मोबाईल टॉवरवर जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला़. ५० ते ६० फुट उंच असलेल्या या टॉवरवर या महिलेने सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चढण्यास सुरुवात केली़. ही बाब काही वेळात लोकांच्या लक्षात आली़. त्यांनी आरडाओरडा करुन तिला खाली उतरण्यास सांगितले. पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती़. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले़. तोपर्यंत ही महिला सुमारे ३० फुट उंच चढली होती़. त्यामुळे तिला बोलती ठेवत काही जण टॉवरवर चढले़ आणि तिला पकडून खाली उतरविले़. अगदी शोले स्टाईल या आंदोलनामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़. बंडगार्डन पोलीस अधिक माहिती घेत आहेत.