बारामती: चूक नसताना पोलिसांनी भाऊ आणि त्याहीपेक्षा देशाच्या एका सौनिकाचा अपमान करत त्याला मारहाण केली. ही घटना अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे जोपर्यंत पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी माझा लहान भाऊ अशोक याला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत आमच्या गावात त्याचा जाहीर सत्कार करत दिलगिरी व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशा शब्दात अशोक इंगवले यांचे मोठे बंधू सेवानिवृत्त सैनिक किशोर इंगवले यांनी ‘लोकमत’शी बोलताना बारामतीपोलिसानी केलेल्या मारहाणीच्या घटनेप्रती संताप व्यक्त केला. अशोक इंगवले यांना रविवारी (दि. १७) बारामती तालुका पोलीस ठाण्यात मारहाण झाली. यावेळी प्रत्यक्षदर्शी म्हणून किशोर इंगवले याठिकाणी उपस्थित होते. पोलिस कर्मचाऱ्यांनी किशोर यांना देखील धक्काबुक्की केली. या घटनेविषयी बोलताना किशोर इंगवले म्हणाले, आम्ही शिवजयंतीच्या कार्यक्रमाची परवानगी व शहीदांच्या शोकसभेचे निमंत्रण देण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात गेलो होते. यावेळी माझ्यासह अशोक व एक लहान मुलगा आमच्या सोबत दुचाकीवर होता. आम्ही ट्रीपल सीट आलो म्हणून आम्हांला आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत शिवीगाळ केली. आम्ही त्यांना आम्ही कोणत्या कामासाठी आलो आहोत ते सांगितले. परंतु ते ऐकून न घेता. आम्हाला धक्काबुक्की करत ठाणे अंमलदाराच्या कक्षात नेण्यात आले. आम्ही रीतसर दंडाची पावती फाडतो, असे म्हणालो असता त्या कक्षातून ढकलत आम्हाला बाहेर काढण्यात आले. तसेच यावेळी अशोक याच्या अंगावरील वर्दीचाही सन्मान न राखता त्यालाही धक्काबुक्की करण्यात आली. सैन्याच्या वर्दीचा केलेला अपमान, धक्काबुक्की, शिवीगाळ सहन न झाल्याने अशोक याने रागाच्या भरात तेथील खुर्ची तोडली. यावेळी त्याच्या अंगावर आठ-नऊ पोलिसांनी झडप टाकली. व त्याला महिला पोलिस कर्मचा?्यांच्या कक्षाच्या नजीक असणाऱ्या सीसीटीव्ही नसणाऱ्या खोलीत नेऊन बेड्या ठोकल्या. मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता मलाही ढकलून देण्यात आले. खोलीत अशोक याला बेदम मारहाण करण्यात आली. महिला पोलिसांनी देखील त्याला मारले. सुमारे दीडतास त्याच्या हातात बेड्या होत्या. मी येथील पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना हा प्रकार थांबवण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशोक याच्या हातातील बेड्या काढण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी बेडीची चावी हरवली आहे असे उत्तर दिले. या प्रकारामुळे आम्हाला प्रचंड धक्का बसला होता. आम्ही ज्या कामासाठी आलो ते ऐकूनही न घेता पोलिसांनी थेट मारण्यास सुरूवात केली. माझी १८ वर्षे सैन्यदलात सेवा झाली आहे. देशाची सेवा करताना कधीही कर्त्यव्यात आम्ही कसुर केली नाही. देशाचा अभिमान असणारी वर्दी अंगावर चढवताना दिलेली शपथ आजही स्मरणात आहे. मात्र पोलिसांना त्यांच्या खाकी वर्दीच्या प्रतिष्ठेचा व दिलेल्या शपथेचा विसर पडलेला दिसतो. जो सैनिक दुसऱ्या क्षणाला देशासाठी बलीदान देण्याची तयारी ठेवतो. त्यालाच जर अशी वागणुक मिळत असेल तर हा संपूर्ण सैन्यदलाचा अपमान आहे, अशा शब्दात किशोर इंगवले यांनी आपल्या भावना मांडल्या.
आता माघार नाही...जोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी दिलगिरी व्यक्त करणार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 6:14 PM
आम्ही शिवजयंतीच्या कार्यक्रमाची परवानगी व शहीदांच्या शोकसभेचे निमंत्रण देण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात गेलो होते.
ठळक मुद्देअशोक इंगवले यांच्या बंधूंची मागणी