भूगाव : मुळशी तालुक्यातील भादस (गावडेवाडी) ते करमोळी फाट्यापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाल्याने आठ गावे-वाड्यांतील संतप्त नागरिकांनी पौड बसस्थानकापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढीत प्रशासनाचा निषेध केला. रस्त्याचे काम होईपर्यंत आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचा ठराव सवार्नुमते परिसरातील ग्रामपंचायतींनी घेतला आहे. या संबधीचे पत्रही नायब तहसीलदार भगवान पाटील व सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील विद्यार्थी, महिला तसेच कामगारवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.मुळशी तालुक्यातील भादस (गावडेवाडी) ते करमोळी फाट्यापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर रावडे, हुलावळेवाडी, खुबवली, असदे, शिळेश्वर, गावडेवाडी, भादस ही गावे आहेत. गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. परंतु पौड, पुण्याकडे जाण्यासाठी एकमेव रस्ता असल्याने नाईलाजाने ग्रामस्थांना खड्ड्यांतूनच जावे लागत आहे.
या रस्त्यावर तब्बल १६ वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. बांधकाम विभाग फक्त तात्पुरती मलमपट्टी करते, परंतु पुन्हा एक-दोन आठवड्यांतच ‘जैसे थे’च परिस्थिती. या परिसरात जागतिक दर्जाचे महिंद्रा कॉलेज व आंतरराष्ट्रीय दर्जाचे रिव्हरडेल शाळा तसेच एक माध्यमिक विद्यालय आहे. संपूर्ण जगाच्या कानाकोपºयातून पालकवर्ग विद्यार्थ्यांना भेटायला येथे येतात; परंतु रस्त्याची ही दुरवस्था पाहून पालकही नाराजीने पाठ फिरवत आहेत.या रस्त्यावर करमोळी फाट्यापासून रावडे, हुलावळेवाडी, खुबवली, असदे, शिळेश्वर, गावडेवाडी, भादस, संभवे ही गावे क्रमवार येऊन पुढे रस्ता मुळशीकडे जातो. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात आमदार थोपटे यांनी या रस्त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. काँग्रेस आणि भाजपाकडून केवळ श्रेय लाटण्यासाठी दोनदा भूमिपूजनही झाले. वास्तविक मंजूर रस्ता हा करमोळी फाट्यापासून होणे गरजेचे होते. परंतु मुळशीमार्गे संभवे गाव सोडल्यानंतर अर्ध्या किलोमीटरवर हा रस्ता सुरू होऊन गावडेवाडीपर्यंतच हा रस्ता झाला. त्याचा कोणत्याच गावाला उपयोग होत नाही.
गावडेवाडीपासून पौडकडे जाणाºया रस्त्याची अवस्था तर अतिशय दयनीय आहे. या रस्त्यावरून विद्यार्थी, शेतकरी कामगार दुग्ध व्यावसायिक सतत ये-जा करतात. सध्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. दगडगोट्यांनी भरलेल्या या रस्त्यावरून पायी चालणेही मुश्किल झाले आहे.यावेळी सार्वजनिक विभागाच्या कार्यालयाजवळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी उपअभियंता अनिल शिंदे हे कार्यालयात अनुपस्थित असल्याने शाखा अभियंता विलास पाटील यांनी निवेदन स्वीकारले. हा रस्ता विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रस्तावित केलेला असुन त्याला लवकरात लवकर मंजुरी देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. यावेळी काही नागरिकांनी सेवा म्हणून अधिकाºयांचे जोडे पुसून देण्याचा प्रयत्न केला.