पुणे: महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये सुरु असलेली धुसफूस लपून राहिलेली नाही. त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेचे बाण सोडले जात आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे पटोले यांनी मुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत आहे असा गंभीर आरोप केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, याच दरम्यान भाजपने काँग्रेस हा महाविकास आघाडी सरकारमध्ये नको असलेला पाहुणा बनला आहे अशा शब्दात टीकास्त्र सोडले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची मोठी अडचण होऊ लागली असून सध्याचे आघाडीचे सरकार आता तिघाडीचे सरकारच बनले आहे. तसेच सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेसला फारसे विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे काँग्रेस हा सरकारमध्ये नको असलेला पाहुणा बनला आहे, असे टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
वादग्रस्त वक्तव्यामुळे काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वांदग निर्माण झाले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याने वाद आणखी उफाळून आला आहे. धोरणात्मक निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे कॉंग्रेसची अवस्था बिकट बनली आहे असेही भंडारी म्हणाले.
विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांचे निलंबन राजकीय हेतूने करण्यात आले असा आरोप करून भंडारी म्हणाले, सभापतीपदाची निवडणूक झाकण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने भाजपचे आमदार अनुपस्थित राहावेत यासाठीच ही कार्यवाही करण्यात आली.परंतु, याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली सुरु आहेत.---------------------------खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान न दिल्यामुळे प्रीतम मुंडे व पंकजा मुंडे नाराज असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे.परंतु, याबाबत चर्चा सुरु असून लवकरच नाराजी दूर होईल, असेही भंडारी यांनी सांगितले.