पुणे : शहराच्या विविध भागात पालिकेने सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मागील तीन महिन्यांपासून पगारच झालेला नाही. कोरोनाकाळातही काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासू लागली असून, ठेकेदाराकडून मात्र तक्रार केल्यास धमकावले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नागरी सुविधा केंद्रामध्ये पालिकेचे विविध कर भरून घेतले जातात. पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये नागरिकांना यावे लागू नये याकरिता त्यांच्या भागात ही सुविधा देण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून हे काम सुरू आहे. पालिकेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने या नागरी सुविधा केंद्रांसाठी मनुष्यबळ घेतले आहे. याठिकाणी शेकडो कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पगार द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकट
कामगारांना वेळेत वेतन दिले गेले पाहिजे. त्यांना वेतन मिळेल याची दक्षता ठेकेदाराने घ्यावी. यासंबंधी संबंधित ठेकेदाराकडे विचारणा केली जाईल. तसेच, कामगारांना थकलेले वेतन मिळेल यासाठी सूचना केल्या जातील.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका